

त्याला अजून कुठे जग कळायचे होते. वडील बाहेर चल म्हणताच तो आनंदाने त्यांच्यासोबत निघून गेला. त्या निष्पाप जीवाला काय माहीत की, हा त्याचा शेवटचा दिवस असेल म्हणून. चारित्र्याच्या संशयावरून त्याने आपल्याच तीन वर्षांच्या निष्पाप मुलाचा निर्घृण खून केला; पण त्याला हे पाप पचणार नव्हते, अवघ्या काही तासांत त्याच्या पापाचा घडा भरलाच...
भरदिवसा पुणे शहरातून सूरज नावाचा एक लहान मुलगा बेपत्ता झाल्याची बातमी शहरात वार्यासारखी पसरली. पोलिसांनी युद्धपातळीवर त्याचा शोध सुरू केला होता. मात्र, तो काही मिळून आला नाही. तेवढ्यात दुपारी पुण्यातील नगर रोड दर्ग्याच्या बाजूला असलेल्या एका सोसायटीच्या परिसरात निर्जनस्थळी एका लहान मुलाचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. तेथे जाऊन पोलिसांनी खात्री केली असता, तो मृतदेह सूरज याचा असल्याचे पुढे आहे. चाकू आणि ब्लेडने गळा चिरून त्याचा खून करण्यात आला होता. सुरुवातीला मुलगा बेपत्ता झाल्याचा बनाव, उडवाउडवीची उत्तरे देत सूरजचाच जन्मदाता वडील विजय याने पोलिसांना गुंगारा देण्याचा मोठा प्रयत्न केला. परंतु, त्याच्या निर्दयी कृत्याचा काही लेखाजोखा सीसीटीव्ही कॅमेर्यांत कैद झाला होता. त्याचाच धागा पकडून चंदननगर पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावत त्याला बेड्या ठोकल्या.
विजय मूळचा आंध्र प्रदेशातील. पेशाने आयटी अभियंता. नोकरीच्या निमित्ताने 2016 पासून तो पुण्यात वास्तव्याला होता. पत्नी, मुलगी आणि तीन वर्षांचा सूरज असे चौघेजण एकत्र राहत होते. विजय संशयखोर वृत्तीचा माणूस होता. चारित्र्याच्या कारणातून तो आपल्या पत्नीवर नेहमीच संशय घ्यायचा. मुलगा सूरजबाबत त्याच्या मनात वेगळाच कट शिजत होता. तो काही बोलत नसला, तरी मागील काही दिवसांपासून त्याचे वर्तन वेगळेच सुरू होते. त्याच्या डोक्यात भलताच विचार थैमान घालत होता.
एकेदिवशी त्याला ती संधी मिळाली. दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास विजय त्याची सात वर्षांची मुलगी शाळेतून येणार असल्यामुळे तिला बसमधून घेण्याच्या बहाण्याने बाहेर पडला. यावेळी त्याने सूरजला सोबत घेतले. त्यानंतर दीड वाजता तो एका बारमध्ये गेला. यावेळी सूरज त्याच्यासोबतच होता. त्या ठिकाणी विजय याने मद्य प्राशन केले. त्यावेळी 2 वाजले होते. अडीच वाजताच्या सुमारास विजय याने खराडी बायपास परिसरातील एका सुपर मार्केटमधून ब्लेड, चाकू आणि हँडवॉश खरेदी केले.
नगर रोड दर्ग्याच्या बाजूला असलेल्या एका सोसाटीच्या परिसरात निर्जनस्थळी त्याने सूरजचा चाकू आणि ब्लेडने गळा चिरून खून केला. त्याचा मृतदेह त्याच ठिकाणी टाकून तो साडेपाच वाजताच्या सुमारास खराडी येथे आला. विजयच्या अंगावर रक्ताचे डाग पडलेले होते. आपले हैवानी कृत्य कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून त्याने एका कपड्याच्या दुकानात नवीन कपडे खरेदी केले. त्याने त्याच ठिकाणी जुने कपडे बदलले. पुढे रक्ताचे डाग पडलेले कपडे त्याने एका कचराकुंडीत टाकून दिले. त्यानंतर तो एका लॉजवर जाऊन झोपी गेला.
दुसरीकडे, मुलगा आणि पती दोघे बेपत्ता झाल्याने विजयच्या पत्नीने शोधाशोध सुरू केली होती. नातेवाईक, ओळखीचे व्यक्ती यांच्याकडे विचारपूस केली. परंतु, दोघे कोठेच मिळून आले नाहीत. शिवाय, विजयचा मोबाईलदेखील बंद लागत होता. शेवटी पत्नीने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे विजयचा पत्ता शोधला असता तो एका लॉजवर असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने भरपूर दारू ढोसलेली होती. तो बोलण्याच्या शुद्धीत नव्हता. पोलिसांनी त्याच्याकडे सूरजबाबत चौकशी केली, तेव्हा त्याने पोलिसांना आपण सिगारेट पीत असताना हडपसर बसस्थानक परिसरातून तो हरवला असल्याचे सांगितले.
पोलिसांनी त्याच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. तरी त्याचे उत्तर तेच. परंतु, थांबतील ते पोलिस कसले? पोलिसांना आता विजयच्या बोलण्याचा वेगळाच संशय येऊ लागला. त्यांनी त्याच्या बोलण्यावर विश्वास न ठेवता त्याने सांगितलेल्या स्टोरीप्रमाणे सूरजचा शोध सुरू केला. मात्र, तो हडपसर परिसरात गेला नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. दुसरीकडे, सीसीटीव्ही कॅमेर्याच्या माध्यमातून शोध घेतला, त्यावेळी दुपारी अडीच वाजेपर्यंत विजय याच्यासोबत सूरज होता. परंतु, पाच वाजता कपड्याच्या दुकानात तो जेव्हा गेला, तेव्हा तो एकटाच दिसून आला. दोन ते अडीच तासांच्या वेळेत त्याने निष्पाप सूरजचा खून केला.
शेवटी पोलिसी खाक्या दाखवताच आपण पत्नीवरील चारित्र्याच्या संशयावरून मुलगा सूरज याचा खून केल्याची कबुली दिली. आता असल्या या निर्दयी आणि उलट्या काळजाच्या बापाला बाप तरी कसे म्हणायचे, योग्य संधी साधून डसणारा सापच तो..!