.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नाशिक : निलंबित वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यांच्या पालकांच्या नावावर कोट्यवधी रुपयांच्या १२ मालमत्ता आढळल्याने नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र रद्द करण्यासंदर्भात कारणे दाखवा नोटीस नाशिक विभागीय आयुक्तांनी खेडकर कुटुंबीयांना बजावली आहे. दरम्यान, पूजा खेडकर यांच्या वडिलांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी मुदत मागितली असून, विभागीय आयुक्तांनी त्यांना दोन आठवड्यांची मुदत दिल्याचे वृत्त आहे. विभागीय आयुक्तालयातील अधिकृत सूत्रांनी यास दुजोरा दिला आहे.
पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर हे वर्ग एक अधिकारी असूनही पूजा हिने नॉन क्रिमीलेअर गटातून यूपीएससी परीक्षेत 'आयएएस'चे पद मिळविले होते. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी उपविभागीय अधिकार्यांनी हे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र दिल्याचे उघड झाले होते. नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी या प्रमाणपत्राबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानंतर अहिल्यानगर जिल्हाधिकार्यांनी पूजा खेडकर हिचे वडील दिलीप व आई मनोरमा खेडकर यांच्या मालमत्तांची चौकशी केली. या दोघांच्या पॅनकार्ड नोंदीवर असलेल्या मालमत्तांची माहिती घेण्यासाठी पुण्यातील नोंदणी महानिरीक्षकांना पत्र लिहून मालमत्तांची माहिती मागितली होती. यात पूजा खेडकरच्या पालकांच्या नावावर तब्बल १२ मालमत्ता असल्याचे आढळून आले. त्यामुळे डॉ. गेडाम यांनी खेडकर कुटुंबीयांना नॉन क्रिमीलेअर रद्द का करू नये, अशा आशयाची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांना सादर केलेल्या अहवालानुसार खेडकर कुटुंबीयांच्या नावे कोट्यवधींच्या मालमत्ता आहेत. त्यामुळे खेडकर कुटुंबीय नॉन क्रिमीलेअरच्या निकषात बसत नाहीत. त्यामुळे विभागीय आयुक्तांनी खेडकर कुटुंबीयांना नोटीस बजावली आहे. त्यानुसार पुढील सुनावणीत दिलीप खेडकर काय म्हणणे मांडतात? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.