

गणेश गोडसे, बार्शी
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखामसला या गावचा माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे (वय 34) याला नर्तकी प्रेयसीचा विरह सहन झाला नाही. त्यामुळे त्याने बार्शी तालुक्यातील सासुरे येथे आपल्या महागड्या कारच्या काचा आतून बंद करून घेत स्वतः डोक्यात गोळी मारून घेऊन आपला जीवन प्रवास संपवला. या घटनेने सोलापूरसह बीड जिल्ह्यातही खळबळ उडाली.
बर्गे याच्या आत्महत्या प्रकरणात पूजा गायकवाड या 21 वर्षीय तरुण नर्तकीला वैराग पोलिसांनी अटक केली. बार्शी न्यायालयाने तिला दोनदा पोलिस कोठडी दिली. सध्या ती न्यायालयीन कोठडीत आहे. मात्र एका नर्तकीच्या पायात अवघ्या 34 व्या वर्षी एक जीव संपला, त्याचे कुटुंब उघड्यावर आले. याचा अनेकांनाच मोठा धक्का बसला. दिवसेंदिवस गोविंद बर्गे याच्याबाबत मोठे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. योग्य वेळी व योग्य वळणावर कोणती काळजी घेणे गरजेचे आहे याचा बोध घेतला गेला पाहिजे. एका कला केंद्रातील नर्तकीच्या प्रेमात आकंठ बुडाल्यानेच याच प्रेमात त्याचा अंत झाल्याने आता या प्रकरणाने खळबळ उडाली आहे.
बीड जिल्ह्यातील लुखामसला या गावचे माजी उपसरपंच बर्गे हा तरुण राजकारण करतानाच व्यवसायातही चांगलाच सक्रिय होता. गत काही वर्षांपासून प्लॉटिंगच्या व्यवसायात त्याचे चांगले बस्तान बसले होते. त्या व्यवसायातून चांगला पैसा मिळाला असल्यानेच त्याने गेवराईला टोलेजंग बंगला, मोठी जमीन, चारचाकी गाडीही खरेदी केली होती. मात्र पैसा जास्त झाल्यावर जगणे स्वैर होते. त्याचे तसेच झाले. जादा पैसे माणसाला वेगळ्या मार्गावर घेऊन जातात. नेमकं तेच बर्गे याच्या बाबतीत घडलं. त्याला कला केंद्रात जाण्याचा नाद लागलेला होता.
एका कला केंद्रातील नर्तकी पूजा गायकवाड हिच्याशी त्याची चांगली गट्टी जमली. हळूहळू ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. नर्तकीसाठी गोविंद हा कला केंद्राकडे नियमित ये-जा करू लागला. थोड्याच दिवसांत तो पूजाच्या प्रेमात आकंठ बुडाला. तिला सख्ख्या बायकोचा दर्जा देऊ लागला. आपले वैभव, संपत्ती, ऐश्वर्य तो पूजासमोर खुले करू लागला आणि नेमकं इथेच पूजाच्या मनात लोभाची पाल चुकचुकली. दीड वर्षाच्या कालावधीत बर्गे याने पूजाला आयफोन, महागडे सोन्याचे दागिने भेट म्हणून दिले. नातेवाईकांच्या नावावर प्लॉट करून देण्याबरोबरच महागडे मोबाईल दिले. मात्र पूजाचा हव्यास वरचेवर वाढतच गेला.
महत्त्वाकांक्षी पूजाच्या प्रेमापेक्षा मागण्या वेगळ्या होत्या. तिचा बंगला, पैशांच्या हव्यास वाढला होता. त्यातून तिने गोविंदकडे गेवराईतील त्याने कमवलेला टोलेजंग बंगला आणि काही जमिनीची मागणी केली. माझी मागणी पूर्ण केलीस तरच मी तुझ्याशी बोलणार, नाही तर अबोला धरणार, असा सज्जड दमच तिने गोविंद बर्गे याला भरला. त्यामुळे पूजाच्या प्रेमात आंधळा झालेला गोविंद सैरभैर झाला. तो तिला समजून सांगण्याचा प्रयत्न करत होता. हा बंगला मी तुला दिला तर नातेवाईकांना समजेल, असे तो म्हणत होता. मी आजपर्यंत तुला खूप काही देण्याचा प्रयत्न केला आहे. प्लॉट, शेती, दागिने सर्व तुला मी दिले आहे. त्यामुळे तू माझ्याशी संवाद तोडू नकोस, असे सांगण्याचा तो प्रयत्न करत होता.