

नाशिक : त्र्यंबकेश्वर येथील पार्किंग माफियांच्या मुजोरी व दादागिरीमुळे भाविक-पर्यटकांसह नागरिक त्रस्त झाले आहेत. ज्यांना पार्किंगचा ठेका मिळाला आहे, तेच सराईत गुन्हेगारांच्या माध्यमातून त्र्यंबकेश्वरमध्ये धार्मिक विधीसाठी येणाऱ्या भाविकांची लुटमार करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सदर वसुली ही फक्त त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातच नाही तर जव्हारकडे जाणाऱ्या गाड्यांनाही अडवून वसुली केली जात आहे.
'पुढारी न्यूज'चे प्रतिनिधी किरण ताजणे यांच्यासह इतर माध्यम प्रतिनिधींना पार्किग माफियांकडून मारहाण झाल्यानंतर या माफियांचे अनेक कारनामे समोर येत आहेत. या गुंडांकडून बाहेरून येणाऱ्या भाविकांना लुटले जातच शिवाय नाशिक जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांनाही त्रास दिला जात असल्याच्या अनेक तक्रारी आहे.
त्र्यंबकेश्वर येथे हजारो भाविक देशभरातून येतात. अनेक भाविक हे स्वतःच्या खासगी वाहनांतून येतात. त्यामुळे पार्किंगचा मुद्दा येथे महत्त्वाचा आहे. मात्र, पार्किंगच्या नावाखाली येथे माफिया अक्षरशः भाविकांची लूट करीत आहेत. शहरात भाविकांची वाहने दाखल होताच तातडीने या गुंडाचे टाेळके पुढे येऊन पावती दाखवतात व अक्षरशः पठानी पद्धतीने वसुली करतात. पार्किंग माफियांचे हे रॅकेट त्र्यंबकेश्वर पुरतेच मर्यादित राहिलेले नाही तर ज्यांना त्र्यंबकेश्वरमार्गे जव्हार- मोखडा जायचे आहे अशा वाहनधारकांना देखील आडवून त्यांच्याकडूनही वसुली करण्यापर्यंत या गुंडाची मजल गेलेली आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये पार्किंगसाठी विशिष्ट जागा शासनाकडून देण्यात आली आहे. त्या परिसरातच पार्किंग केल्यानंतर नियमाप्रमाणे पार्किंग शुल्क घेणे अपेक्षित आहे. मात्र, थेट महामार्गावर येऊन गाड्या अडवून ही वसुली केली जाते. फक्त वाहन चालकाकडून लूट करण्यापूर्वीच हे पार्किंग माफिया मर्यादित राहिलेले नाहीत. येणाऱ्या भाविकांना तुमचं दर्शन लवकर करून देतो, असे सांगून अव्वाच्या- सव्वा पैसे घेतात व त्यांना कुठल्यातरी गल्लीच्या कोपऱ्यात जाऊन सोडून दिले जाते. परराज्यातून आलेल्या भाविकांना या परिसराबद्दल कुठलीही माहिती नसते. त्यामुळे त्यांची फसवणूक होत आहे.