

नाशिक : पालघर येथील धान घोटाळ्यात दोषी आढळलेल्या प्रादेशिक व्यवस्थापक विजय गांगुर्डे यांना आदिवासी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी बडतर्फ केले आहे. याप्रकरणी विजय गांगर्डुे यांच्याकडून 28 कोटी वसुल करण्यासाठी आवश्यक कायदेशीर पावले उचलण्यात येणार आहे. गांगुर्डे यांना यापुर्वीच चौकशीदरम्यान निलंबित करण्यात आले होते.
आदिवासी विकास महामंडळाच्या जव्हार येथील प्रादेशिक व्यवस्थापक पदावर विजय गांगुर्डे कार्यरत असतांना 2022-2023 मध्ये धान घोटाळा झाल्याचे समोर आले. शहापूर येथील उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत पळशीण, साकडाबाव, न्याहाडी, खांडस या आधारभूत धान्य खरेदी केंद्रावर धान्यखरेदीत सुमारे 86 हजार 634 क्विंटल धान व दोन लाख 17 हजार 897 नग बारदनांचा अपहार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर बनसोड यांनी प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते. चौकशीअंती गांगुर्डे यांनी बोगस खरेदी व वाहतूक दाखवून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे समोर आल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले होते. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे निवृत्त प्रकल्पसंचालक वसंत पाटील यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानूसार पाटील यांनी केलेल्या चौकशीत 27 कोटी 91 लाख 95 हजार 232 रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला. पाटील यांचा चौकशी अहवाल आल्यानंतर बनसोड यांनी निलंबनानंतर थेट बडतर्फीची कारवाई केली.
विजय गांगुर्डे हे 2014 च्या भरतीव्दारे प्रोबेशनवर होते कारवाई होते, चौकशी समितीने केलेल्या चौकशीत दोषी आढळल्याने बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. रक्कम वसुलीसाठी आवश्यक कायदेशीर पाऊले उचलली जातील. भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही.
लीना बनसोड, व्यवस्थापकीय संचालक, आदिवासी विकास महामंडळ, नाशिक.