सुनील कदम, कोल्हापूर
लहानपणी तोसुद्धा इतर मुलांसारखाच निरागस आणि कोमल मनाचा होता; पण घरच्या गरिबीमुळे बालपणातच त्याच्या निष्पाप मनाला रक्तबंबाळ करून टाकणारे अनेक ओरखडे परिस्थितीने ओढले. तशातच कठोर समाजमनाने त्याला पदोपदी अपमानित करून त्याचे मनोविश्व छिन्नविछिन्न करून टाकले. परिणामी, त्या निरागस मनोशिवारात एक हैवान जागा झाला, ज्याने अवघ्या जगाला हादरवून सोडले.
त्या हैवानाच्या हैदोसाची ही भयचकित करून सोडणारी कहाणी….
आजकाल युरोप आणि अमेरिका खंडांतील बहुतेक सगळ्या देशांनी जगाच्या पाठीवरील सर्वाधिक प्रगत राष्ट्रे म्हणून नावलौकिक मिळविला असला, तरी या देशांमधील जवळपास पंधरा ते वीस टक्के जनता कोकेन या अमली पदार्थांच्या आहारी गेलेली आहे, हेही तितकेच वास्तव आहे. या भागात कोकेनचे हे विष पेरण्याचे काम करणार्याचे नाव आहे 'पाब्लो एमिलियो एस्कोबार गॅविरीया'! 'हैवान' या शब्दातच पाब्लोचे वर्णन करावे लागेल. कारण, कोकेनच्या चोरट्या व्यापारादरम्यान पाब्लोने मुडद्यांची अक्षरश: रास रचली होती. जगाच्या पाठीवर आजपर्यंत झालेल्या सर्व गुन्हेगारांमध्ये सर्वात खतरनाक गुन्हेगार म्हणून पाब्लोच्या नावाची नोंद आढळते.
पाब्लोची कहाणी सर्वसामान्यांना भयचकीत आणि विस्मयचकीत करणारी आहे. तो मूळचा कोलंबियातील मेडेलीन या छोटखानी शहराचा रहिवासी! 1970 आणि 1980 च्या दशकातील जगातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय कोकेन तस्कर, तो त्याच्या काळातील जगातला सातव्या नंबरचा श्रीमंत होता, पाच हजार एकर परिसरावर त्याचा बंगला होता, शिवाय जवळपास सत्तर देशांमध्ये त्याचे बंगले व अन्य मालमत्ता होती. कोलंबियातील गोरगरीब जनता त्याला आपला मसिहा मानायची. तोही स्वत:ला रॉबीनहूड समजायचा. त्याच्या मालकीची कित्येक विमाने, हेलिकॉप्टर आणि पाणबुड्या होत्या. त्याच्यावर शे-दोनशे नव्हे, तर तब्बल 7601 लोकांचा खून केल्याचा आरोप होता. अमेरिका आणि कोलंबियाचे सरकारही त्याला घाबरून होते. त्याच्याकडे इतका पैसा होता, की ठेवायला जागाच नव्हती. जागा मिळेल तेथे पैशाच्या थप्प्या रचून ठेवल्या जात होत्या. या पैशातील तब्बल सात हजार कोटी रुपये दरवर्षी उंदीर कुरतडून टाकत होते; पण पाब्लोला काही फरक पडत नव्हता. आपल्या काळात पाब्लोने अमेरिका, युरोप आणि आशिया खंडांतील अनेक देशांमधील युवा पिढी कोकेनच्या नशेच्या गर्तेत ढकलली होती. अशा या आंतरराष्ट्रीय कोकेनमाफिया डॉनचा शेवट अमेरिका आणि कोलंबिया सरकारने संयुक्तपणे केलेल्या कारवाईत एन्काऊंटरमध्ये झाला. आज त्याचे नातेवाईकच नव्हे, तर त्याची बायका-मुलेही त्याचे नाव घ्यायचे टाळतात.
कोलंबियातील मेडेलीन या छोट्याशा शहरात आणि एका अत्यंत गरीब कुटुंबात 1 डिसेंबर 1949 रोजी पाब्लोचा जन्म झाला. त्याचे वडील शेतमजूर होते, तर आई प्राथमिक शिक्षिका होती. पाब्लोला दोन भाऊही होते. घरी अठराविश्व दारिद्र्य नांदत होते. त्याच्या झोपडीवजा घरात वीज अथवा पाण्याची सोयही नव्हती. कधी खायला अन्न मिळायचे, तर कधी उपासमार ठरलेली. अशा स्थितीत पाब्लो वाढत होता. शाळा शिकत होता. पायात घालायला बूट नसल्यामुळे अनेकवेळा त्याला अपमानास्पद वागणूक देऊन शाळेतून हाकलून बाहेर काढले जायचे. तशातच शाळेची फी भरायला पैसे नसल्यामुळे पाब्लोला वयाच्या पंधरा-सोळाव्या वर्षीच शिक्षणाला रामराम ठोकावा लागला. गरिबीच्या चटक्यांनी बालवयातील पाब्लोच्या मनावर असंख्य जखमा करून ठेवल्या होत्या. त्यामुळे काहीही करून अफाट पैसा मिळवायचा, असे ध्येय पाब्लोने लहानपणापासून मनात बाळगले होते. पाब्लोने त्याच्या पुढील आयुष्यात कोकेन तस्करीच्या माध्यमातून जो काही उत्पात घडवून आणला, त्याची बिजे त्याने बालवयात भोगलेल्या यातनांमध्ये दडलेली दिसतात. बालपणीच त्याचे आयुष्य इतरांसारखे सुखा-समाधानाचे असते, तर कदाचित पाब्लो नावाच्या 'नरराक्षसा'चा उदयच झाला नसता.
शाळा सोडल्यानंतर पाब्लो पैसे कमावण्यासाठी लहान-मोठ्या चोर्या करायला लागला. सुरुवातीला तो स्मशानातील कबरींभोवती बसविलेले नक्षीदार आणि रंगीबेरंगी दगड चोरून त्याची विक्री करायचा. त्यानंतर छोट्या-मोठ्या चोर्या करू लागला. लॉटरीची बनावट तिकिटे विकू लागला; पण यातून त्याच्या पदरात फारसे काही पडत नव्हते. त्यामुळे त्याने कार चोरी आणि बँकेत आलेल्या लोकांचे पैसे लुबाडणे सुरू केल. यातूनही पाब्लोला अपेक्षित 'उत्पन्न' मिळत नव्हते. त्यामुळे त्याने झटपट श्रीमंतीसाठी श्रीमंत लोकांचे अपहरण करून त्यांच्या सुटकेच्या बदल्यात खंडणी उकळायला सुरुवात केली. या नव्या धंद्यात त्याला चांगलीच आमदनी होऊ लागली आणि वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी पाब्लो लक्षाधीश आणि 22 व्या वर्षी करोडपती बनला. एक खतरनाक किडनॅपर म्हणून पाब्लोच्या नावाचा देशभर गवगवा झाला. त्याच्या नुसत्या निरोपावर घाबरून जाऊन श्रीमंत लोक खंडणी देत होते.
1970 च्या दशकात कोलंबियामध्ये अलवारो प्रेटो नावाचा एक कुख्यात कोकेन तस्कर होता. पाब्लोच्या कारवाया बघून प्रेटोने जाणले, की हा मुलगा आपल्या कामाचा आहे. म्हणून त्याने त्याला आपल्या टोळीत सामील करून घेतले. त्या काळात कोलंबिया आणि अमेरिकेमध्ये कोकेन तस्करी प्रचंड प्रमाणात होत होती. अमेरिकेत कोकेनची तस्करी करणार्या अनेक टोळ्या होत्या आणि त्यांच्यामध्ये अनेकवेळा कडाक्याचा संघर्ष व्हायचा. प्रेटोच्या टोळीत काम करीत असताना पाब्लोने प्रतिस्पर्धी टोळीचा म्होरक्या फैबियो रेस्ट्रेपो याचा मुडदा पाडला आणि आपल्या नरसंहाराची खर्या अर्थाने पायाभरणी केली. कारण, त्यानंतर पाब्लो आणि त्याच्या टोळीने पाडलेल्या मुडद्यांची गणतीच नाही. जो जो आडवा येईल, मग तो कुणी का असेना, पोलिस असो की न्यायाधीश, पाब्लो टोळीकडून त्याचा मुडदा पाडला जायचा.
अल्पावधीतच पाब्लोने प्रेटोची साथ सोडली आणि कोकेन तस्करीसाठी स्वत:ची टोळी तयार केली. अनेकांचा विश्वास बसणार नाही, पण पाब्लोने सर्वप्रथम तस्करी केलेल्या कोकेनची किंमत केवळ 210 रुपये होती; पण जणूकाही ती वादळापूर्वीची भयाण शांतता होती. त्यानंतर त्याने चिमटीने नव्हे, तर चक्क टनाने कोकेनची तस्करी करायला सुरुवात केली आणि जवळपास एक चतुर्थांश अमेरिकन जनता कोकेनच्या आहारी गेली. पाब्लोची टोळी सुरुवातीला कोलंबियातून अमेरिकेत कोकेनची तस्करी करण्यासाठी अमेरिकेच्याच सरकारी विमानांचा वापर करायची. अमेरिकन विमानाच्या वैमानिकाला भल्या मोठ्या रकमेचे आमिष दाखवायचे आणि त्याला आपल्या टोळीत सामील करून घ्यायचे. त्यानंतर विमानाच्या टायरमध्ये कोकेन भरायचे आणि विमान अमेरिकेत गेल्यानंतर त्या वैमानिकाच्याच मदतीने ते कोकेन काढून घेऊन त्याची अमेरिकेत विक्री करायची, अशी ती पद्धत होती; मात्र अनेक वेळा ही तस्करी पकडली जायची. काहीवेळा वैमानिक तयार व्हायचे नाहीत. अशा अनेक अडचणी येत होत्या, तरीही या माध्यमातून पाब्लोने अल्पावधीतच अब्जावधी रुपये मिळविले.
त्यानंतर पाब्लोने कोकेन तस्करीसाठी स्वत:च्या मालकीची यंत्रणाच उभी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याने अमेरिकेतील फ्लोरिडा प्रांतानजीक असलेले 'नॉरमस' नावाचे एक बेटच विकत घेतले. या बेटावर त्याने विमानतळ तयार केला. स्वतःच्या मालकीची काही विमाने आणि हेलिकॉप्टर्स खरेदी केली आणि त्यातून कोकेनची तस्करी सुरू केली. आता स्वत:ची वाहतूक यंत्रणा असल्याने पाब्लोने दररोज टनाने कोकेन अमेरिकेत पाठवायला सुरुवात केली.
1980 च्या दशकात दिवसाला साधारणत: पंधरा ते पंचवीस टन कोकेन पाब्लो अमेरिकेत पाठवत होता. केवळ अमेरिकाच नव्हे, तर जगभरातील सुमारे सत्तर देशांमध्ये पाब्लोने आपल्या कोकेन तस्करीचे जाळे विणले होते. त्यासाठी देश-विदेशातील त्याच्या टोळीतील हजारो सहकारी काम करीत होते. त्या काळात जगभरात चालणार्या कोकेनच्या बाजारातील 80 टक्के मालाचा पुरवठा पाब्लोच्या टोळीकडूनच केला जात होता. यावरून पाब्लोचे कोकेनविश्व किती प्रचंड प्रमाणात विस्तारले होते, त्याचा अंदाज येण्यास हरकत नाही. सुरुवातीला केवळ अमेरिकेपुरते पाब्लोच्या कोकेन तस्करीचे विश्व मर्यादित होते; पण हळूहळू त्याने संपूर्ण अमेरिका, युरोप आणि आशिया खंडाला व्यापून टाकले होते. याच दरम्यान हवाईमार्गे होणार्या कोकेन तस्करीवर अनेक मर्यादा आल्या. बहुतेक सगळ्या विमानतळांवर विमानांची कडक तपासणी होऊ लागली. त्यामुळे पाब्लोची कोकेन तस्करी धोक्यात आली; पण गप्प बसेल तर तो पाब्लो कसला? पाब्लोने हवाईमार्गे होणार्या कोकेन तस्करीचा धोका ओळखून जलमार्गाने कोकेन तस्करी सुरू केली, तीही कुणाच्याही नजरेस पडणार नाही, अशा पद्धतीने. त्यासाठी पाब्लोने चक्क काही पाणबुड्याच खरेदी केल्या. पाब्लोची कोकेन तस्करी आता समुद्राच्या तळातून सुरू झाली.
पाब्लोने अमेरिकेत दररोज टनाने कोकेन ओतण्याचा सपाटा लावल्यामुळे 1980 च्या दशकात अमेरिकेतील जवळपास एक चतुर्थांश जनता कोकेनच्या आहारी गेली होती. त्यामध्ये अर्थातच युवक-युवतींचे प्रमाण लक्षणीय होते. देशातील युवा पिढी प्रचंड प्रमाणात कोकेनच्या आहारी जात असल्याचे बघून अमेरिकन सरकारही खडबडून जागे झाले.
अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी 1986 मध्ये देशातील कोकेन वापरावर कडक निर्बंध लादले. कोकेन तस्करीला आळा घालण्यासाठी कडक पावले उचलली; पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. पाब्लोने संपूर्ण अमेरिकाभर आपल्या कोकेन तस्करीचे जाळे विणले होते. कोलंबियाची अवस्थाही फार काही वेगळी नव्हती. केवळ अमेरिका-कोलंबियाच नव्हे तर अमेरिका, युरोप आणि आशिया या तीन खंडांमधील अनेक देशांतील युवा पिढी पाब्लोच्या कोकेन तस्करीच्या जाळ्यात अडकली होती. कोकेनच्या या नशेतून युवा पिढीला कसे बाहेर काढायचे आणि पाब्लोच्या कारवाया कशा रोखायच्या, याची अनेक देशांना भ्रांत लागून राहिली होती; पण दरम्यानच्या वीस वर्षांच्या कालावधीत पाब्लोने आपल्या अत्यंत खतरनाक कारवायांनी कोलंबिया, अमेरिकेसह अनेक देशांच्या उरात धडकी भरविली होती.
पाब्लोविरुद्ध कारवाई करण्याचे धाडस जेथे सरकारमध्ये नव्हते, तेथे पोलिस आणि न्यायपालिका तरी काय करणार? ती यंत्रणाही पाब्लोला वचकूनच होती. कारण, पाब्लोने त्यांच्यातील अनेकांचे पूर्वी मुडदे पाडले होते. अशा पद्धतीने पाब्लोच्या तस्करीच्या साम्राज्यासह त्या भागात त्याच्या दहशतीचेही साम्राज्य पसरले होते. (क्रमश:)