

गोमंतकीय युवकांना विदेशाचे आकर्षण मोठे आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर परदेशात नोकरीसाठी जाणे हे बहुतांश गोमंतकीय युवकांचे स्वप्नच असते. याचाच फायदा परदेशात नोकरी देणार्या काही बोगस एजंटांनी घेतला. बांबोळी-गोवा येथील एका युवकाला विदेशात नोकरी करण्याचे आमिष दाखवून चक्क गुलामगिरीत ढकलण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. त्यानंतर गोवा सायबर क्राईम विभागाने केलेल्या तपासात आंतरराष्ट्रीय सायबर स्लेवरी जॉब स्कॅम उघड झाल्याने गोमंतकीय युवकांना जबरदस्त धक्का बसला आहे.
म्यानमारमधून चेतन मुरगावकर (बांबोळी) या पीडित युवकाची गेल्या फेब्रुवारी महिन्यात सुटका करण्यात आली होती. गोवा सायबर विभागाकडून त्याचा जबाब नोंदवून घेत असताना धक्कादायक प्रकार उघड झाला. थायलंडमधील एका कॉल सेंटरमध्ये नोकरी असल्याची जाहिरात सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली होती. या जाहिरातदार एजंटने प्रतिमहा 60 हजार रुपये वेतनाची नोकरी मिळेल, असे सांगितले. त्यानंतर सर्व पाठपुरावा केल्यानंतर संबंधित एजंटने पीडित युवकाला 14 जानेवारी रोजी थायलंड येथे नेले.
15 जानेवारी रोजी थायलंडला पोहोचल्यानंतर दुसर्याच दिवशी त्याला बोटीतून म्यानमारमध्ये नेण्यात आले. येथील कॉल सेंटरमध्ये नेत त्याला अमेरिकन नागरिकांना मोबाईलवरून युवती असल्याचे संदेश पाठवून हनीट्रॅपमध्ये ओढण्यास व पैसे गुंतवण्यास भाग पाडण्याचे काम देण्यात आले. त्याच्यासोबत आणखी काहीजण होते. तेथील लष्कराने या कॉल सेंटरवर छापा टाकून पीडितांची सुटका केली होती. त्यानंतर चेतनला भारतात आणण्यात आले होते.
चेतनने दिलेल्या माहितीनुसार, गोवा पोलिसांच्या सायबर विभागाकडून आंतरराष्ट्रीय सायबर स्लेवरी जॉब स्कॅमचा पर्दाफाश करण्यात आला. सुटका होऊन गोव्यात पोहोचल्यानंतर चेतनने एक संशयित तामिळनाडू येथील असल्याची माहिती पोलिसांना दिली. यावरून पोलिसांनी आदित्य रविचंदन (तामिळनाडू) या संशयिताला अटक केली. आदित्य रविचंदन याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे रूपनारायण गुप्ता (मुंबई) याला अटक केली.
रूपनारायण गुप्ता हा मुंबईत इवांका ही नोकरभरती एजन्सी चालवत होता. ही एजन्सी नोंदणीकृत नाही. रूपनारायण गुप्ताच्या चौकशीच्या आधारे चिनी वंशाचा तलानीती नुलाक्शी याच्यापर्यंत पोहोचणे पोलिसांना शक्य झाले. त्याला दिल्लीत अटक केली. नुलाक्शी हा व्हॉटस्अॅप, टेलिग्राम या माध्यमांच्या आधारे आर्थिक गैरव्यवहार करत होता. या तिघांच्याही ‘झूम’वर बैठका व्हायच्या. या बैठकीत नोकरीसाठी मुलाखती घेण्यापासून पैसे घेण्यापर्यंतची कार्यपद्धती ठरायची. अटक करण्यात आलेल्या संशयितांकडून माहिती मिळविण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे.
विदेशात नोकरभरती करणार्या गोव्यात फक्त 9 मान्यताप्राप्त एजन्सी आहेत. कंबोडिया व थायलंडमध्ये एजंटमार्फत नोकरीसाठी जाणार्यांनी सावधानता बाळगून व कागदपत्रे तपासून व्यवहार करावा, असा सल्ला पोलिसांनी दिला आहे. बँक खाते व सिम कार्ड भाड्याने घेऊन नोकरीच्या आमिषाने फसवणूक करणारे हे एक आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे.