

NRI Groom Fraud
लग्नाची शोधाशोध सुरू असताना ‘परफेक्ट’ वर मिळावा, हे प्रत्येकाचंच स्वप्न असते. पण, लुधियान्यातील पोलिस विभागातील एका महिला कर्मचार्याचे हेच स्वप्न दुर्दैवाने तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का ठरले.
पामल गावची रहिवासी आणि लुधियाना रेंज डीआयजी कार्यालयात कारकून म्हणून काम करणार्या अमरजित कौर (बदलेले नाव) यांनी विवाहासाठी ऑनलाईन जाहिरात दिली होती. त्याच जाहिरातीवरून व्हॉटस्अॅपवर त्यांना एका एनआरआय वराची चौकशी आली. समोरचा स्वतःला इंग्लंडमध्ये राहणारा असल्याचे सांगत होता. बोलणं गोड, संवाद सुरेख एवढंच नाही तर काही दिवसांतच त्याने आपली आई आणि बहीण यांचीही ओळख करून दिली. विश्वास बसावा अशी परिस्थिती तयार करण्यात आली.
आणि मग आला ‘शगुन’ चा टप्पा! तो म्हणाला, मी तुला लग्नासाठी सोन्याचे दागिने, महागडे गिफ्ट पाठवले आहे. पण, ते कस्टममध्ये अडकले आहे. सोडवण्यासाठी काही पैसे द्यावे लागतील.
पहिल्यांदा संशय आला तरी समोर आई-बहीण बोलल्याने विश्वास बसला. एकदा, दोनदा नाही तर तब्बल पाच वेळा पैसे ट्रान्सफर केले गेले. एकूण 79 लाख रुपये! पैसे पाठवल्यावर काही दिवस फोन वाजत होता. आश्वासने मिळत होती. पण, मग अचानक मोबाईल बंद. गिफ्ट नाही आणि वर ही नाही.
सध्या लग्नाच्या शोधात असलेल्या लग्नाळूंकडून वर व वधूच्या शोधासाठी ऑनलाईन विवाहाच्या जाहिराती करण्याचं फॅड सुरू आहे. याचाच फायदा सायबर चोरटे घेत आहेत. यातूनच एनआरआय मॅरेज स्कॅमचे प्रकार देशभरात वाढत आहेत. टार्गेट करून फसवेगिरी करणार्यांचा हा एक ठरलेला प्रकार आहे. यात आरोपी स्वतःला एनआरआय असल्याचे सांगतो. त्यानंतर तो कुटुंबातील सदस्यांची खोटी ओळख करून देतो, व्हिडीओ कॉल, फोटो यांचा वापर करून विश्वासार्ह वातावरण तयार करतो. काही दिवसांतच ‘शगुन’ गिफ्ट, सोन्याचे दागिने किंवा डॉलर्स पाठवल्याचे सांगून तोतया कस्टम अडथळा दाखवला जातो. गिफ्ट सोडवण्यासाठी फी द्या, एअरपोर्टवर अडकलोय अशा सबबी सांगून सतत पैसे मागितले जातात. सापळ्यात अडकलेली व्यक्ती भावनिकद़ृष्ट्या गुंतल्यामुळे शंका घेत नाही आणि लाखोंचा गंडा बसतो.
अशा स्कॅमपासून वाचायचे असेल तर कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर अंधविश्वास ठेवू नका. ऑनलाईन वर-वधूंच्या ओळखीची अधिकृत पडताळणी करा. गिफ्ट किंवा लग्नाच्या खर्चाच्या नावाखाली कोणी पैसे मागितले तर त्वरित सावध व्हा. नेहमी थेट कुटुंबीय किंवा विश्वासार्ह माध्यमांद्वारे माहिती तपासा आणि संशय आला की सायबर हेल्पलाईन 1930 किंवा स्थानिक पोलिस ठाण्यात कळवा.