

नाशिक : येथे अतिशय सुनियोजित पद्धतीने दंगल घडविण्याचा प्रयत्न झालेला आहे. अनधिकृत धार्मिक स्थळाचे अतिक्रमण हटविताना जाणीवपूर्वक दंगल घडविण्यात आली, असा गंभीर आरोप राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. दंगलखोरांवर कठोर कारवाई करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर दंगेखोरांवरील कारवाईला वेग येणार आहे.
शहरातील काठे गल्ली परिसरात अनधिकृत धार्मिक स्थळावरील कारवाई दरम्यान झालेल्या दंगलीत जमावाने पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना बुधवारी (दि.१६) घडली होती. यात काही पोलिस कर्मचारीही जखमी झाले होते. तसेच यामध्ये अनेक वाहनांचे नुकसानही झाले होते. दंगलीनंतर पुन्हा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला असून, सद्यस्थितीत या भागात तणावपूर्ण शांतता आहे. बीड येथे माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिकमधील दंगलीवर भाष्य केले. फडणवीस म्हणाले की, नाशिकमध्ये सुनियोजित पद्धतीने दंगल घडविण्याचा प्रयत्न झालेला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर तेथील लोकांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घेण्यात येईल, असे पोलिसांना सांगितले होते. तसेच अतिक्रमण काढण्याची सुरुवातही त्यांनी स्वत: केली होती. मात्र, त्याचवेळी काही मंडळींनी जाणीवपूर्वक दगडफेक करत दंगा तयार केला. त्यामुळे आता त्या संदर्भात कडक कारवाई करण्यात येत आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
या दंगल प्रकरणात मुंबई नाका पोलिस ठाण्यात १४०० ते १५०० जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये काही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे. एमआयएमचे शहराध्यक्ष मुख्तार शेख यांना अटक करण्यात आली आहे. नाशिकमध्ये दि. १९ एप्रिल ते ३ मे पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशांनुसार हे आदेश लागू करण्यात आले आहेत. त्या अंतर्गत शहरात आंदोलन करणे, शस्त्र घेऊन फिरणे, चित्रांच्या प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करण्यास मनाई असणार आहे. संवेदनशील भागात जमावबंदीचे आदेश जारी केले गेले आहेत.