

वणी (ता. दिंडोरी) : वणी-पिंपळगाव रोडवरील वणी शिवारात असलेल्या खाबिया बाजार या होलसेल किराणा दुकानावर चोरट्यांनी धाड टाकून तब्बल ६ लाख ३१ हजार ९२० रुपयांचा माल लंपास केल्याची घटना नुकतीच घडली आहे.
फिर्यादी मधुबाला अल्केश खाबिया (४८, रा. छत्रपती शिवाजी रोड, वणी) यांच्या दुकानात ही चोरी (दि.17) रोजी रात्री ८ ते १८ सप्टेंबर सकाळी ८ या दरम्यान झाली. चोरट्यांनी दुकानाच्या पाठीमागील लोखंडी पत्र्याची खिडकी व पश्चिम बाजूचा शटर फोडून आत प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी तेलाचे १२० डबे, जिरे, काजू, बदाम, वेलदोडे, खजूर, कोलगेटसह विविध किराणा साहित्य असा मोठा मालावर डल्ला मारला आहे.
विशेष म्हणजे, चोरट्यांनी आधीच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे फिरवून निष्क्रिय केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मात्र याचवेळी दुकानातील एका कॅमेऱ्यात दोघे चोरटे कैद झाले आहेत. चोरीस गेलेला माल पिकअप वाहनातून नेण्यात आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गिरणारे येथून चोरीस गेलेली पिकअप या गुन्ह्यात वापरल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
परिसरात सलग होत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी श्वानपथक व ठसे तज्ज्ञांच्या मदतीने पुढील तपास सुरू केला आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक गायत्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक हेमंत राऊत हे पुढील तपास करीत आहेत.