

नाशिक : अनैतिक संबंधातून तीन पुरुष व दोन महिलांनी एकमेकांवर प्राणघातक हल्ले केल्याची घटना इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळील एका हॉटेलसमाेर घडली हाेती. या घटनेतील गंभीर जखमी झालेल्या संशयित आरोपीने रुग्णालयातून पळ काढल्याची घटना शनिवारी (दि.७) घडली आहे. दीपक संजय कपिले (रा. गाेरेराम लेन, रविवार कारंजा) असे फरार झालेल्या संशयिताचे नाव आहे. दीपक उपचार घेत असलेल्या रुग्णालयावर पोलिसांचा पहारा होता, तरीदेखील तो पसार झाल्याने चर्चेचा विषय बनला आहे.
अनैतिक प्रेमसंबंधातून वाद झाल्याने दोन महिला व त्यांच्यासोबत असलेल्या एका पुरुषाने दीपक व त्याच्या जोडिदारावर प्राणघातक हल्ला केला होता. तर दीपकनेही जोडिदारासह मिळून दोन महिला व एकीच्या नातलगावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली. चौघांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. तर दीपक हा गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर पंचवटीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मुंबई नाका पाेलिस त्याच्यावर लक्ष ठेवून होते, तसेच उपचार पूर्ण हाेताच त्याच्या अटकेची तजवीज करण्यात आली हाेती. मात्र शनिवारी (दि.7) रोजी रात्री कपिले याने पाेलिसांची नजर चुकवून रुग्णालयातून पळ काढला.
कपिलेवर हल्ला करणारे आणि त्याचा साथीदार हे न्यायालयीन कोठडीत आहे. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून दीपक याने न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर मंगळवार (दि.१०) रोजी सुनावणी होणार होती. मात्र, त्याआधीच दीपकने रुग्णालयातून पळ काढला. त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांकडे चौकशी केली आहे.
नाशिक : मुंबई नाका येथील हॉटेलबाहेर दोन्ही गटांत प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली. एका व्यक्तीने वादातून दुसऱ्या विवाहितेसोबतचे व्हिडिओ व फोटो आपल्या प्रेयसीला पाठवले. यामुळे प्रियकर आणि प्रेयसीमध्ये वाद झाला. संतप्त प्रियकराने मित्राच्या मदतीने प्रेयसीसोबत असलेल्या एका पुरुषावर हल्ला केला. त्यानंतर प्रेयसी व एका पुरुषासह दुसऱ्या विवाहितेने मिळून प्रियकरावरही हल्ला केला. या प्रकरणी दोन्ही गटांविरोधात परस्पर विरोधी जीवे मारण्याचे गुन्हे मुंबईनाका पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत.
रविवारी (दि. २५) मुंबईनाका येथील एका हाॅटेलमध्ये दोन विवाहिता व एक पुरुष जेवण करीत होते. तिघे हॉटेलबाहेर आले. त्यावेळी तेथे आलेल्या संशयित दीपक कपिले व त्याचा जोडीदार दत्ता आंधळे यांनी दोन्ही महिलांसह त्यांच्यासोबत असलेल्या रोहित गोरडे यास शिवीगाळ करीत वाद घातला. लाकडी दांड्याने दीपकने एका विवाहितेस मारहाण केली. त्यामुळे रोहितने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता दीपकने त्यालाही दांड्याने मारहाण केली. महिलेने रोहितचा बचाव करण्याचा प्रयत्न केला असता दाेघा संशयितांनी तिलाही मारहाण केली. गर्दी जमल्याने दोघे संशयित तेथून निघून गेल्याची फिर्याद एका विवाहितेने दिली आहे. तर दीपकच्या फिर्यादीनुसार, प्रेयसीने फोन करून बोलवून घेत वाद घातला. त्यानंतर रोहित याने धारदार हत्याराने गळ्यावर वार करून तसेच कानाला चावा घेत गंभीर दुखापत केली. त्यानंतर दोघी विवाहितांनी रोहितसह पळ काढला. याप्रकरणी दीपकच्या फिर्यादीनुसार, रोहितसह दोन्ही विवाहितांविरोधात गुन्हा दाखल आहे.
विवाहितेच्या फिर्यादीनुसार, संशयित दीपक संजय कपिले ऊर्फ डीके (३४, रा. रविवार कारंजा) याच्यासोबत ती आठ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होती. विवाहानंतरही त्यांच्या भेटीगाठी होत होत्या. दरम्यान, ४ महिन्यांपासून विवाहिता दीपकसोबत बोलत नसल्याने दीपकने दुसऱ्या विवाहितेसोबतचे व्हिडीओ आणि फाेटो तक्रारदार विवाहितेस पाठवले होते. त्यानंतर तक्रारदार विवाहितेने माहेर गाठत दुसऱ्या विवाहितेचा शोध घेत दीपकला व्हिडिओ कॉल केला. तसेच दुसऱ्या विवाहितेकडे दीपकविरोधात तक्रार करीत आम्ही आठ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगितले. त्याचा राग आल्याने दीपकने तक्रारदार प्रेयसीस शिवीगाळ केली. त्यानंतर दोघे पुन्हा बोलत होते. रविवारी दोन्ही विवाहिता रोहितसह हॉटेलमध्ये गेल्यानंतर दीपकसोबत पुन्हा वाद झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटना घडल्यानंतर संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेत साेडून दिले होते. मात्र, मुंबईनाका पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने तपास करीत रोहित रंगनाथ गोरडे (३२, रा. सिडको), दिगंबर ऊर्फ दत्ता निवृत्ती आंधळे (रा. दिंडोरी रोड) यांच्यासह इतर दोन संशयित महिलांना पकडून मुंबईनाका पोलिसांच्या ताब्यात दिले.