

नाशिक : मखमलाबाद येथील तवली फाटा परिसरातील अमृतवन गार्डनजवळ शेताच्या विहिरीत पडून दीडवर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना सोमवार, दि. १० मार्च रोजी घडली होती. याप्रकरणी चिमुकलीच्या आईने म्हसरूळ पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार चिमुकलीच्या पित्यासह, आजी व शेतमालकाने निष्काळजीपणा केल्याने चिमुकलीचा मृत्यू झाल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैष्णवी विकास वळवी असे विहिरीत बुडून मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. वैष्णवी आई विद्या वळवी (रा. पाेखरी नांदगाव, ता. नांदगाव) यांच्या फिर्यादीनुसार, त्या पतीपासून विभक्त राहतात. त्यांनी वैष्णवीची चौकशी केली असता विकास वळवी यांनी सांगितले की, वैष्णवीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यामुळे तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. ही बाब विद्या वळवी यांनी पोलिसांना सांगितली. त्यानंतर न्यायालयाचा आदेश घेत अपर तहसीलदार आणि वरिष्ठ पोलिसांच्या समक्ष वैष्णवीचा पुरलेला मृतदेह काढून शवविच्छेदन करण्यात आले.
शवविच्छेदन अहवालात पाण्यात बुडाल्याने वैष्णवीचा मृत्यू झाल्याचा नित्कर्ष शवविच्छेदन अहवालातून समोर आला. त्यामुळे विद्या वळवी यांनी त्यांचे पती विकास हेमंत वळवी, सासू जिजाबाई हेमंत वळवी व शेतमालक विजय पिंगळे (तिघे रा. शिंदे मळा, मखमलाबाद) यांनी दुर्लक्ष केल्यामुळे वैष्णवीचा मृत्यू झाल्याचा आरोप केला. विहिरीस कडा किंवा संरक्षक भिंत नसल्यामुळे व पती आणि सासूने वैष्णवीकडे दुर्लक्ष केल्याने ती विहिरीत पडली. त्यानंतर पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाला. त्यामुळे तिघांनी केलेल्या दुर्लक्ष, निष्काळजीपणा व हलगर्जीपणामुळे वैष्णवीचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस तपास करीत आहेत.