

नाशिक : इयत्ता दहावी परीक्षेचा तणाव किंवा अन्य कारणातून लहवित येथील पंचशिलनगरमध्ये राहणाऱ्या 16 वर्षीय दिव्या दीपक भवार या विद्यार्थिनीने गळफास घेऊन जीवन संपवले. त्याचे नेमके कारण निष्पन्न झाले नसले, तरी अभ्यासासह पेपरच्या तणावातून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.
दिव्याने नुकताच दहावी परीक्षेचा पहिला पेपर दिला हाेता. त्यानंतर ती तणावात हाेती. त्यातच तिने दुसऱ्या पेपरचा अभ्यास सुरू केला असतानाच, शुक्रवारी (दि. २७) रात्री ११.३० पूर्वी घरात असताना गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना लक्षात येताच तिची काकू धनश्री दिलीप भवार यांनी नातलगांच्या मदतीने दिव्याला देवळाली कॅम्प येथील कॅन्टाेन्मेंट रुग्णालयात दाखल केले असता डाॅ. धीरज कटारे यांनी तपासून मृत घाेषित केले.
दिव्या ही अभ्यासात हुशार हाेती. असे असताना तिने नेमके अभ्यासाच्या किंवा लेखी पेपरच्या तणावातून आणि अन्य कारणातून टाेकाचे पाऊल उचलले का याचा तपास पाेलिसांनी सुरू केला आहे. मृत दिव्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ व बहीण असा परिवार असून, तिचे वडील मुंबईत खासगी सुरक्षा कंपनीत कार्यरत आहेत. या घटनेने लहवित भागात हळहळ व्यक्त होत असून देवळाली कॅम्प पाेलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे.