

नाशिक : घरबसल्या दोन ते पाच हजार रुपये कमविण्याचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी व्यापाऱ्याला तब्बल ७३ लाख ३१ हजार १८६ रुपयांना गंडा घातला.
याबाबत प्रवीण जयकुमार अग्रवाल (४५, रा. कवडेनगर, नांदगाव) यांनी नांदगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दि. २४ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या काळात हा प्रकार घडला. त्यांच्याशी टेलिग्रामवरून एकाने संपर्क साधत सोन्याचे दागिने बनविणाऱ्या ऑस्ट्रेलियन कंपनीचे ब्रैंडिंग केल्यास दिवसाला दोन ते पाच हजार रुपये मिळतात, असे आमिष दाखवले. त्यास भुलून अग्रवाल यांनी भामट्याने दिलेल्या वेबसाइटवर अकाउंट उघडले. त्यांच्या अकाउंटवर भामट्यांनी पहिले पैसे टाकून विश्वास संपादन करत नंतर वेगवेगळ्या कारणांनी विविध बँकांच्या अकाउंटवर पैसे भरण्यास भाग पाडले. यात त्यांचे ७३ लाखांवर पैसे अडकलेत. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.