

नाशिक : गौरव अहिरे
शहरातून दि. १ ते ३० मार्च दरम्यान चोरट्यांनी एकूण ५१ वाहनांवर डल्ला मारला. त्यात चार अवजड आणि एक कारचाकी वाहनाचा समावेश आहे. एकूण ७६ लाख ७९ हजार ९०० रुपयांची वाहने लंपास झाली असून, यातील बहुतांश प्रकरणांची उकल झालेली नाही. त्यामुळे वाहनचालकांना आर्थिक नुकसानीचे धनी व्हावे लागले आहे.
शहरात कुठेही चोरी झाली नाही, असा एकही दिवस नाही. कुठे ना कुठे चोरटे किमती ऐवजावर डल्ला मारतातच. महिन्याला कोट्यवधी रुपयांचा ऐवज चोरीला जातो, त्यात वाहनांचाही समावेश असतो. शहरातून मार्च महिन्यात ५१ वाहने पळविली गेली. अंबड आणि पंचवटी पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून सर्वाधिक प्रत्येकी सहा वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत, तर उपनगर, नाशिक रोड, म्हसरूळ, मुंबई नाका, इंदिरानगर, आडगाव या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ४ ते ५ वाहन चाेरीचे गुन्हे दाखल आहेत. म्हसरूळ पोलिस ठाण्यामध्ये एका गुन्ह्यात दोन दुचाकी वाहने चाेरीस गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांकडून तपासचक्रे फिरवली जात असली, तरी त्यात मोठे असे यश आलेले नाही.
पंचवटी : ६
अंबड : ६
उपनगर : ५
आडगाव : ५
म्हसरूळ : ५
सरकारवाडा : ४
नाशिक रोड : ४
मुंबई नाका : ४
इंदिरानगर : ४
गंगापूर : ४
भद्रकाली : १
देवळाली कॅम्प : १
सातपूर : १
पोलिसांनी आतापर्यंत पकडलेल्या वाहन चोरट्यांनी चोरलेली वाहने परजिल्ह्यात किंवा ग्रामीण भागात विक्री केल्याचे उघडकीस आले आहे. वाहनांची कागदपत्रे आणून देतो, असे सांगत अवघ्या ५ ते १० हजार रुपयांत महागडी वाहने विक्रीचा फंडा चोरटे वापरत आहेत. तसेच मौजमस्तीसाठी अल्पवयीन मुले वाहनचोरी करीत असल्याचे काही प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे पोलिसांनी चोरीची वाहने खरेदी करणाऱ्यांवरही लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे.