

नाशिक : पंचवटीतील नांदूरनाका येथील राहुल धोत्रे या युवकाच्या हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी असलेला भाजपचा माजी नगरसेवक २२ दिवसानंतरही फरारच आहे. त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळताना न्यायालयाने पोलिसांच्या तपासावर ताशेरे ओढल्यानंतरही निमसेला बेड्या ठोकण्यात पोलिसांना अपयश आले आहे. आता विरोधकांकडून थेट राज्याच्या गृहविभागावरच हल्लाबोल केला जात असल्याने, आतातरी पोलिसांच्या तपासाला गती येईल काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गेल्या २२ ऑगस्ट रोजी राहुल धोत्रे याला निर्घृणपणे मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आडगाव पोलिस ठाण्यात निमसेसह १० संशयित आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून निमसे फरार होता. निमसेच्या शोधासाठी चार पोलिस पथकेही रवाना करण्यात आली होती. याशिवाय संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी 'एसआयटी' देखील स्थापन केली. मात्र, मुख्य संशयित आरोपीच पसार असल्याने, या प्रकरणाच्या तपासाला अजूनही म्हणावी तशी गती मिळाली नाही. दरम्यान, निमसेनी अटक टाळण्यासाठी दोनदा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयात सादर केला. मात्र, दोन्ही अर्ज न्यायालयाने फेटाळून लावले. याशिवाय पोलिसांच्या कामगिरीवर न्यायालयाने ताशेरे ओढले.
दरम्यान, निमसे फरार असल्याने, विरोधकांकडून आता राज्याच्या गृहविभागावर थेट हल्लाबोल केला जात आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी (दि.१२) जनआक्रोश मोर्चात 'राहुल धोत्रे या तरुणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांच्या कार्यकर्त्यांनी हत्या केली. कुठे गेला हा उद्धव निमसे? कसा सापडत नाही हा? तुमचा एक नगरसेवक खून करून फरार होतो. तो फरार असताना गिरीश महाजनांना जाऊन भेटतो. त्याला कोण वाचवत आहे? हे जर राज्याच्या गृहमंत्र्यांना आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांना माहीत नसेल तर तुम्ही राज्य करायला नालायक आहात, असा घणाघात केला. त्यामुळे आता तरी उद्धव निमसेला पोलिस बेड्या ठोकतील काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
उद्धव निमसेच्या शोधासाठी पोलिसांची चार पथके विविध भागांमध्ये रवाना करण्यात आली आहेत. सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख हे या संपूर्ण प्रकरणाचा तपास करीत आहेत. मात्र, २२ दिवसानंतरही निमसे पोलिसांच्या हातावर तुरी देण्यात यशस्वी होत आहे. निमसे स्वत:ची सुटका करण्यासाठी वजनदार राजकीय मंत्र्यांच्या भेटी घेत आहेत. मात्र, पोलिसांना ते कसे सापडत नाहीत, त्यांचे गॉडफादर कोण? असा हल्लाबोल आता विरोधकांकडून केला जात आहे.