

सिन्नर (नाशिक) : तालुक्यातील शहा येथील २७ वर्षीय सराईत गुन्हेगार भय्या ऊर्फ प्रवीण गोरक्षनाथ कांदळकर (२७) याच्या खून प्रकरणी वावी पोलिसांनी शहा येथील चौघा संशयितांना अटक केली आहे. या चौघांना सिन्नर न्यायालयात हजर केले असता त्यांना २९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सराईत गुन्हेगार भय्या कांदळकर याचा शनिवारी सकाळी पूर्ववैमनस्यातून गावातीलच १४ जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण करून खून केला होता. भय्या हा दोन वर्षांच्या तडीपारीनंतर शहा येथे घरी आला होता. गावातीलच गोराणे नामक कुटुंबीयांचे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याशी वाद सुरू होते. शनिवारी सकाळी कांदळकर यांच्या घरी संशयित १४ जण आले. त्यांनी भय्या यास कोयता, कुऱ्हाड, लोखंडी गज, लाकडी दांड्याने मारहाण केल्याची फिर्याद त्याची आई विजया कांदळकर यांनी दिली होती. पोलिसांनी १४ संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, मयत भय्या याच्यावर सोमवारी सकाळी नाशिक जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर दुपारी शहा येथे अंत्यसंस्कार झाले. यावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक गणेश शिंदे पुढील तपास करीत आहेत.
वावी पोलिसांनी या प्रकरणी दिनेश मोतीराम ऊर्फ वाळिबा गोराणे (२१), राहुल गोरख बागल (२९), अतुल अशोक गोराणे (२५) व अमित ऊर्फ आबा अण्णासाहेब उर्फ गोटीराम गोराणे (२९, सर्व रा. शहा) या संशयितांना अटक करून सिन्नर न्यायालयात हजर केले होते.