

नाशिक : जेलरोड परिसरात दोन तडीपार गुंडामध्ये झालेल्या वादातून एकाचा खून झाल्याची घटना जेलरोड येथील मोरे मळा परिसरात घडली. पुर्ववैमन्यसातून वाद झाल्यानंतर हितेश सुभाष डोईफोडे याचा खून झाला आहे. या घटनेने गुन्हेगारांवरील प्रतिबंधात्मक कारवाई फक्त कागदावरच असल्याचे दिसून आले. या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.
मोरे मळा परिसरात गुरुवारी (दि.१) रात्री ही घटना घडली. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले हितेश डोईफोडे व निलेश पेखळे हे समोरासमोर आले. दोघांवर गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्यांना तडीपार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. तरीदेखील दोघेही विनापरवानगी शहरात वास्तव्य करत हाेते. जुलै २०२४ मध्ये हितेश याला विनापरवानगी शहरात वास्तव्य केल्याप्रकरणी अटकही केली होती. दरम्यान, गुरुवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास मोरे मळा बालाजी नगर येथे दोन्ही समोरासमोर आले. दोघे मित्र असले तरी त्यांच्यात वाद सुरु होते. त्यातूनच जुन्या वादातून पुन्हा दोघांमध्ये भांडण झाले व दोघेही एकमेकांवर धावून गेले. हाणामारीत निलेशने धारदार हत्याराने हितेश याच्यावर हल्ला केला असता हितेशच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तो जखमी झाला. तसेच हितेशचा मित्र बंटी याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता निलेशने त्याच्यावरही हल्ला केला. या घटनेत हितेश गंभीर जखमी झाल्याने निलेश याने कारमधून हितेशला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर निलेशने तेथून पळ काढत नाशिकरोड पोलिस ठाणे गाठून पोलिसांना घटना सांगितली. दरम्यान, या हल्ल्यात जखमी झालेल्या बंटीला नातलगांनी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी निलेशविरोधात गुन्हा दाखल केला आहे.