

घोटी ( नाशिक ) : पती-पत्नीच्या भांडणात रागाच्याभरात पतीने गळा दाबून पत्नीचा खून केल्याची घटना इगतपुरी तालुक्यातील अडसरे बु. परिसरातील फळविहिरवाडी येथील टिपे वस्तीवर घडली. याप्रकरणी पतीला ताब्यात घेण्यात आले आहे. सावळीराम तुकाराम टिपे (रा. टिपेवस्ती, फळविहिरवाडी, अडसरे बु. ता. इगतपुरी) असे संशयित पतीचे नाव आहे.
मयत सारिका टिपे हिची आई आशा भारमल (रा. शेनीत ता. अकोले) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शनिवारी (दि. ८) रात्री १ वाजेच्या सुमारास सावळीराम टिपे व त्याची पत्नी सारिका सावळीराम टिपे (३३) हिच्यासोबत घरगुती वादातून भांडण झाले. यात सावळीराम याने रागाच्या भरात पत्नी सारिकाचा गळा आवळल्याने त्यात ती जागीच ठार झाली. घोटी पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पथकाने घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा करून संशयित सावळीराम टिपे यास अटक केली. या घटनेप्रकरणी पोलिस उपविभागीय अधिकारी हरीष खेडकर, घोटीचे पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासकामी मार्गदर्शन केले. याबाबतचा पुढील तपास उपनिरीक्षक प्रवीण उदे हे करीत आहेत.