

इगतपुरी : इगतपुरी येथील तळेगाव शिवारात न्यूयॉर्क व्हिलामध्ये जुगार खेळणाऱ्यांवर मध्यरात्री पोलिसांची धाड मारून त्यांच्याकडील 19 लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. या कारवाईत 18 जणांवर कारवाई करून इगतपुरी पोलीस ठाण्यात मुंबई दारूबंदी व जुगारबंदी कायद्यानुसार व्हिलाचालक शक्ती ढोलकीया याच्यासह 18 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, इगतपुरी हद्दीतील तळेगाव शिवारातील मिस्टीक व्हॅली परिसरातील न्युयॉर्क व्हिलामध्ये जुगार सुरु असल्याची गुप्त माहिती पोलीसांना मिळाल्यानंतर पोलीस अधिक्षक विक्रम देशमाने व अप्पर पोलीस अधिक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक ग्रामीण पोलीस पथक व इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांनी पोलीस पथकासह शनिवार (दि. १५) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास न्युयॉर्क व्हिलामध्ये धाड टाकली.
धाड टाकल्यानंतर या ठिकाणी काही जण जुगार खेळतांना व काही जण विदेशी महागडी मद्य प्राशन करतांना आढळून आले. यावेळी जुगाऱ खेळणाऱ्या व्यक्तींची झडती घेतली असता त्यांच्याकडे 18 लाख 79 हजार 450 रुपये हस्तगत करण्यात आले तसेच कोट्यवधी रूपयांच्या बीएमडब्ल्यू सारख्या महागड्या गाड्याही जप्त करण्यात आल्या आहेत.