

पंचवटी (नाशिक) : नागरिकांच्या मनात असलेली गुंडांची दहशत कमी व्हावी, कायदा आणि सुव्यवस्था सुरक्षित राहण्यासाठी, पोलिसांविषयी जनतेत विश्वास निर्माण व्हावा, यासाठी म्हसरूळ पोलिसांनी सराईत गुन्हेगारांची धिंड म्हसरूळ परिसरात काढली.
परिसरात शांतता नांदावी व गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा, यासाठी ही मोहीम राबविण्यात आल्याचे म्हसरूळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अंकुश चिंतामण यांनी सांगितले.
सराईत गुन्हेगार हर्षद कापडे, ओम आहेर, धनराज गणेशकर, उमेश खनपटे, करण आहेर यांची धिंड कणसरा माता चौक, चाणक्यपुरी सोसायटी, अश्वमेधनगर, भाजी बाजार आदी परिसरांतून काढण्यात आली. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईचे स्वागत करताना गुंडांवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली. नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन म्हसरूळ पोलिसांकडून करण्यात आले. आगामी काळात गुंडांविरुद्ध कठोर मोहिमा राबविण्याचे उद्दिष्ट पोलिसांचे असल्याचे अंकुश चिंतामण यांनी सांगितले.