

सिडको : अंबड-लिंक रोड भागात संजीवनगर येथील विराट संकुलानजीक १८ ऑक्टोबरला रात्री साडेआठच्या सुमारास १७ वर्षीय तरुणावर कोयत्याने हल्ला करत अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी अंबड पोलिसांनी एका अल्पवयीनसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धीरज शिवशंकर वर्मा (वय १७, रा. अंबिका रो हाउस, संजीवनगर, अंबड-लिंक रोड) असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. धीरज हा विराट संकुलानजीकच्या दुकानात समोसा घेण्यासाठी गेला होता. तेथून घरी परत येत असताना एका दुकानाजवळ संशयित आरोपी साहिल चौधरी, महफुज खान, कैफ खान, फरहान चौधरी, शाहबाज शेख, सिराज खान आणि मैफुज राशीद खान हे कारमध्ये होते. या सर्वांनी मागील भांडणाचा राग मनात धरून धीरजला शिव्या देत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शाहबाज शेख याने धीरजच्या उजव्या हातावर कोयत्याने वार केला. कैफ खान याने धीरजचा कॉलर पकडत त्याला जबरदस्तीने कारमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी दुचाकीवरून कैफ, मेहफुज आणि राशिद खान हे तिघेही आले आणि त्यांनीही धीरजला शिवीगाळ केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात एक अल्पवयीनसह ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संदीप शेवाळे करीत आहेत.