नाशिक : काठे गल्ली येथील सातपीर बाबा दर्ग्यावरील अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईदरम्यान काही संशयितांनी सोशल मीडियावर चिथावणीखोर आणि पोलिसांविषयी द्वेष पसरवणाऱ्या पोस्ट केल्याचे उघड झाले आहे. या पोस्टमुळे जमाव गोळा होऊन दगडफेकीसारखी परिस्थिती निर्माण झाली. या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी कारवाई सुरू केली असून, संशयितांची धरपकड केली जात आहे.
याप्रकरणी राजकीय कनेक्शन असल्याचे समारे आले आहे. या प्रकरणात संशयित आरोपींमध्ये काँग्रेसचे हनिफ बशीर, ठाकरेंच्या शिवसेनेच्या निलोफर शेख, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अरीफ हाजी पटेल शेखचा यांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. तर गुरुवार (दि.17) रोजी काल रात्री 8 जणांना अटक करण्यात आली आहे.
38 संशयितांची धरपकड; शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
दगडफेक आणि हिंसाचार प्रकरणी तब्बल 1400 ते 1500 जणांवर गुन्हा दाखल
सातपीर बाबा दर्गा अतिक्रमण प्रकरणावरून सुरू असलेल्या वादाला गतिमान वळण मिळाले आहे. याप्रकरणी जिल्हा, उच्च न्यायालयातही युक्तिवाद झाला होता. या दरम्यानच, दर्गा ट्रस्टच्या वतीने सर्वोच्च न्यायालयातही दावा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, दर्गा ट्रस्टने स्वयंस्फूर्तीने दर्गा काढण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शहर पोलिसांनी मंगळवारी (दि. १५) रात्री परिसरात वाहतुकीवर बंदी घालून बॅरिकेडिंग व तटबंदी केली. त्याच सुमारास पखाल रोडवरील उस्मानिया चौक परिसरात सुमारे हजार ते दीड हजार नागरिकांचा जमाव एकत्र झाला. अचानक वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर जमाव आक्रमक बनला आणि पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज व अश्रुधुराचा वापर करावा लागला. सुमारे अर्ध्या तासात जमाव पांगवण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने दंगलखोरांविरोधात कारवाई सुरू केली. समांतर तपासादरम्यान अरीफ हाजी पटेल-शेख, फईम शेख, हनिफ बशीर आणि दाऊद शेख या संशयितांनी कट रचून दंगल घडविल्याचे समोर आले. सध्या या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
या चौघांनी सोशल मीडियावरून भारताचे सार्वभौमत्व, एकात्मता आणि अखंडत्व धोक्यात आणण्याच्या उद्देशाने चिथावणी दिली. तसेच जमाव गोळा झाल्यानंतर पोलिसांविषयी अफवा पसरवून पोलिसांची प्रतिमा मलीन करीत जमावास दगडफेक करण्यास प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यानुसार या चौघांसह इतर सुमारे दीड हजार लोकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, जमावातील काही संशयितांकडे धारदार शस्त्रे होती. त्यांनी या शस्त्रांसह पोलिसांच्या दिशेने दगड, विटा आणि फरशीचे तुकडे फेकले. याशिवाय, जमावाने परिसरातील वीजपुरवठा खंडित केल्याचा संशयही व्यक्त होत आहे. परिसरातील इमारतींच्या गच्च्यांवरूनही पोलिसांवर दगडफेक झाली. घटनास्थळी शहरातील विविध भागांतील वाहने आढळून आल्याने, ही दंगल पूर्वनियोजित असल्याचा संशय अधिक बळावत आहे.
या प्रकरणात पोलिसांनी जमावाविरोधात खुनाचा प्रयत्न, चिथावणी देणे, मारहाण, शासकीय कामात अडथळा आणणे, दंगल घडवणे अशा एकूण ४२ विविध कलमांअंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत. प्राथमिक तपासात संशयितांमध्ये विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला असून, यापूर्वी घडलेल्या दंगलीत या व्यक्तींचा सहभाग होता का, याचीही चौकशी सुरू आहे.
या गुन्ह्यात दोन दिवसांत ३० संशयितांना अटक झाली आहे, तर एका अल्पवयीन संशयितास ताब्यात घेतले आहे. तसेच पोलिसांनी घटनास्थळावरून ७० दुचाकी जप्त केल्या असून त्याआधारे दंगलीत सहभागी झालेल्या संशयितांची ओळख पटवली जात आहे. अटक केलेल्या संशयितांना शनिवारपर्यंत (दि. १९) पोलिस कोठडी सुनावली आहे. तर तपास करीत इतर संशयितांचा शोध पोलिस घेत आहेत.
पोलिस बंदोबस्तात अतिक्रमित बांधकाम काढल्यानंतर पोलिसांनी खबरदारी म्हणून परिसरात बंदोबस्त कायम ठेवला आहे. दर्गा ज्या ठिकाणी होता तेथे सर्वसामान्यांना जाण्यास प्रतिबंध आहे. तसेच परिसराला तटबंदी असल्याने वाहतूक इतर मार्गांनी वळवली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना परिसरातून जाताना पोलिसांची परवानगी घ्यावी लागत असून काही ठिकाणी वादाचे प्रसंग पहावयास मिळाले.