

सुनील कदम
नाशिक लव्ह जिहाद प्रकरणात आतापर्यंत तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरूख कुरेशी, रझा मेमन, शफी शेख, आसिफ अन्सारी, अश्विनी चैनानी आणि निदा खान या आठ आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. यापैकी अश्विनी चैनानी आणि निदा खान वगळता उर्वरीत सहा आरोपी गेल्या काही वर्षांपासून धार्मिक उन्मादाने पछाडल्याचे स्थानिक नागरिकांच्या बोलण्यातून स्पष्ट होते. त्यामुळे या धार्मिक उन्मादातूनच त्यांच्या डोक्यावर लव्ह जिहादचे भूत घिरट्या घालत असावे, असे मानण्यास पुष्कळ वाव आहे. या प्रकरणातील पीडितांनी कंपनी व्यवस्थापनाकडे आणि पोलिसांकडे दिलेले जबाब या बाबतीत पुरेसे बोलके आहेत.
या प्रकरणातील वरील मुख्य आरोपी हे नाशिकच्या वडाळा भागातील रहिवासी आहेत. त्या भागातील काही नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना बोलते केले असता अनेक बाबी चव्हाट्यावर आल्या. हे सहाही आरोपी गेल्या चार-पाच वर्षांपासून काही धर्मांध लोकांच्या नित्यनेमाने संपर्कात होते. या दरम्यानच्या कालावधीतील त्यांचे वर्तन हे आजूबाजूच्या परिसरातील लोकांना संशयास्पद वाटत होते, पण त्यांचा बेत काय असावा, याचा कुणाला थांगपत्ता नव्हता. टीसीएस कंपनीत त्यांनी जो लव्ह जिहादचा अघोरी प्रकार केला, त्यानंतर त्यांची ‘खरी ओळख’ पुढे आली.
कंपनीतील सहयोगी कर्मचार्यांचे ब्रेन वॉशिंग करणे, त्यांना आपलाच धर्म कसा श्रेष्ठ आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न करणे, महिला कर्मचार्यांशी शारीरिक लगट करून त्यांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करणे, वेळप्रसंगी जबरदस्ती करणे, आपला धर्म सोडून अन्य धर्मांची निंदा-नालस्ती करणे, काही अन्यधर्मीय कर्मचार्यांना इस्लामच्या रिती-रिवाजांचे अनुकरण करायला भाग पाडणे, त्यासाठी वेळ पडली तर धाक-दपटशाचा अवलंब करणे, हे आरोपींचे तंत्र विचारात घेता या बाबतीत त्यांनी नक्कीच कुणा ना कुणाकडून तरी ट्रेनिंग घेतले असण्याची शक्यता बळावते. ही शक्यता जर रास्त असेल तर त्यांचे कारनामे या एका कंपनीपुरते मर्यादित नसावेत. अशाच पद्धतीने त्यांनी आजूबाजूच्या परिसरातही ‘काही उद्योग’ केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिसांनी त्या द़ृष्टीनेही तपास करण्याची गरज आहे. तसेच या कामी त्यांना कुणी कोणत्या स्वरूपात अर्थसहाय्य करीत होते काय, याचाही खोलात जाऊन शोध घेण्याची गरज आहे. कारण तसे असेल तर या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे.
आजकाल समाजात लव्ह जिहादबद्दल बराच ऊहापोह सुरू आहे. काही पुरोगामी आणि डाव्या विचारसरणीच्या लोकांच्या मते, ‘लव्ह जिहाद हे एक थोतांड आहे, असा काही प्रकारच अस्तित्वात नाही, जी काही प्रकरणे समोर आली आहेत ती प्रेम प्रकरणांचा भाग असू शकतात’, असे त्यांचे मत असते. पण, असे एखाद-दुसरे प्रकरण असते, तर ते समजून घेण्यासारखे असते. पण राज्यातील चांद्यापासून बांद्यापर्यंत वारंवार अशी प्रकरणे चव्हाट्यावर येऊ लागतात, तेव्हा या बाबतीत निश्चितच एखादे षड्यंत्र असावे, असे मानण्याला पुष्कळ वाव आहे. त्यातूनच देशातील उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेश प्रमाणे राज्यातही लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्याची मागणी जोर धरताना दिसत आहे.
लव्ह जिहाद आणि सुप्रीम कोर्ट!
भारताच्या संविधानातील कलम 25 नुसार देशातील प्रत्येक व्यक्तीला कोणताही धर्म मानण्याचा, त्याचे आचरण करण्याचा, तसेच त्या त्या धर्माचा प्रचार करण्याचे स्वातंत्र्य आहे. हा अधिकार सर्व धर्मांच्या नागरिकांना बरोबरीने आहे. एखादी व्यक्ती नास्तिक असेल, तर त्याला कोणत्याही धर्माचे पालन करण्याची जबरदस्ती केली जाऊ शकत नाही. त्याचप्रमाणे धोक्याने, लालूच दाखवून किंवा कोणत्याही पद्धतीचा दबाव टाकून धर्म परिवर्तन करून घेणे, हे त्या व्यक्तीच्या अधिकाराचे उल्लंघन आहे. त्याला आपल्या जाणीवांच्या विरोधात जाऊन काही करण्यासाठी बळजबरी केली जाऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी स्पष्ट केलेले आहे. ही बाब विचारात घेता नाशिक प्रकरणातील लव्ह जिहाद हे एक गुन्हेगारी कट-कारस्थानच ठरते. कारण आरोपींनी बळजबरीने आणि वेगवेगळ्या आमिषांनी संबंधितांच्या धर्म परिवर्तनाचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे या बाबतीत कठोर कारवाईची आवश्यकता रास्त आहे.
आता प्रतीक्षा कायद्याची!
राज्यात लव्ह जिहादची प्रकरणे वारंवार चव्हाट्यावर येऊ लागल्यानंतर आणि त्याबद्दल मोठ्या प्रमाणात जनक्षोभ उसळू लागल्यानंतर राज्य शासनाने 14 फेब्रुवारी 2025 रोजी ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा समिती’ स्थापन केली आहे. या समितीने काही दिवसांपूर्वी अशा कायद्याचा एक प्राथमिक मसुदा राज्य सरकारला सादर केला आहे. त्यानुसार लवकरच राज्यात लव्ह जिहाद विरोधी कायदा अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टानेही लव्ह जिहादसारख्या प्रकरणांमुळे जर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल, तर राज्य सरकार त्यासाठी स्वतंत्र कायदे करू शकते, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या बाबतीत स्वतंत्र कायदा करण्याचाही मार्ग मोकळा झालेला आहे.
लव्ह जिहाद म्हणजे काय?
लव्ह जिहादची सर्वसाधारणपणे अशी व्याख्या केली जाते की, ‘मुस्लिम मुले गैर-मुस्लिम मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढतात आणि नंतर तिचे धर्म परिवर्तन करून तिच्यासोबत लग्न करतात. कालांतराने या धर्मांतरीत मुलीचा छळवाद सुरू होतो किंवा तिला जिहादी कारवायांमध्ये सामील करून घेतले जाते’; मात्र लव्ह जिहादच्या एका प्रकरणावर भाष्य करताना अलाहाबाद उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या हवाल्याने असे स्पष्ट केले आहे की, ‘जर एखाद्या व्यक्तीला अन्य धर्माविषयी कोणतीही माहिती नाही किंवा त्यावर त्याचा विश्वास नसेल, तर केवळ लग्नासाठी म्हणून त्या व्यक्तीचे धर्म परिवर्तन मान्य केले जाऊ शकत नाही’.