

वणी (नाशिक): वणी-कळवण रस्त्यावरच्या एका किरकोळ वादातून हॉटेल व्यावसायिक आणि एका साक्षीदारावर जीवघेणा हल्ला झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पारिजात इन हॉटेलचे मालक हिरामन सातपुते आणि त्यांचे सहकारी दिलीप बहिरम यांच्यावर एका व्यक्तीने दारूच्या नशेत लोखंडी रॉडने हल्ला केला. केवळ एका पाण्याची बाटली आणि तिच्या पैशांवरून झालेल्या या हल्ल्याने वणीतील संपूर्ण हॉटेल व्यावसायिकांत भीतीचे वातावरण आहे.
मंगळवार (दि.26) रोजी साडेनऊच्या सुमारास अतुल साहेबराव निगळ (रा. ओझे) याने हिरामन सातपुते यांच्याकडे पाण्याची बाटली मागितली. जेव्हा सातपुते यांनी बाटलीचे पैसे मागितले, तेव्हा निगळने मी मोठा पक्षाचा कार्यकर्ता असुन पैसे कसले मागतो म्हणून वाद घालण्यास सुरुवात केली. इतर लोकांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला. मात्र, काही वेळाने निगळ त्याच्या गाडीतून (MH 46 - BE - 1399) परत आला. यावेळी तो हातात लोखंडी रॉड घेऊन आला होता. त्याने कोणताही विचार न करता हिरामन सातपुते आणि साक्षीदार दिलीप बहिरम यांच्यावर लोखंडी राॅडने हल्ला केला या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. इतकेच नाही, तर हल्लेखोराने हॉटेलच्या दर्शनी भागातील काचा फोडून शिवीगाळ करत परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले.
व्यावसायिकांमध्ये संतापाची लाट या घटनेमुळे वणीतील हॉटेल व्यावसायिक अत्यंत संतप्त झाले आहेत. त्यांनी वणी पोलीस स्टेशनला भेट देऊन तातडीने कठोर कारवाईची मागणी केली आहे. वणी पोलिसांनी आरोपी निगळविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. मात्र, अशा घटनांमुळे शांत असलेल्या वणी परिसरातील हॉटेल उद्योगाला जबर धक्का बसला आहे. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पोलिसांनी गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर वचक बसवावा अशी मागणी जोर धरत आहे.