

नाशिकरोड : येथील सॉफ्टवेअर इंजिनियरच्या घरी जीएसटी विभागाने टाकलेल्या छाप्यात बेकायदेशीर गावठी कट्टा व सहा जीवंत काडतुसे सापडली. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात सॉफ्टवेअर इंजिनियरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकरोड येथील आर्टिलरी सेंटर रोडवरील कपालेश्वर बिल्डिंगमध्ये राहणारे श्रीकांत प्रसाद पर्हे (27) यांच्या घरी शनिवारी (दि. २६) सकाळी पुणे येथील जीएसटी विभागाच्या डायरेक्टर जनरल ऑफ इंटेलिजंट झोनल युनिटचे सहसंचालक अभय फाळके व वरिष्ठ इंटेलिजंट अधिकारी वेणू रेड्डी यांच्या पथकाने जीएसटी व्यवहारांबाबत छापा टाकला.
छाप्याची कारवाई सुरू असताना जीएसटी विभागाचे अधिकारी, कर्मचारी कागदपत्रांची पडताळणी करीत होते. त्याच वेळी त्यांना घरात मध्य प्रदेश येथील निर्मित गावठी कट्टा व सहा जीवंत काडतुसे सापडली. याबाबत जीएसटी विभागाचे अधीक्षक मनोज ईश्वर चौधरी यांनी उपनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी गावठी कट्टा आणि काडतुसे जप्त केली आहेत. पोलिस उपनिरीक्षक विशाल सपकाळे अधिक तपास करीत आहेत.