Nashik : पार्सलमध्ये ड्रग्ज.. 58 वर्षीय इसमासह आठ जणांची सव्वा कोटी रुपयांची फसवणूक
नाशिक : पार्सलमध्ये ड्रग्ज असल्याची भीती तसेच विविध आमिषे दाखवून ५८ वर्षीय इसमासह आठ जणांची सव्वा कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, आरोपींचा माग काढला जात आहे.
इलेक्ट्रिकल शॉपचे संचालक यांच्या फिर्यादीनुसार, १३ जून २०२२ ते ११ मे २०२५ या कालावधीत त्यांना संशयिताने बँक खात्याची एसएमएस सेवा चालू करून देण्याच्या बहाण्याने संपर्क साधला. नंतर त्याने 'तुम्ही पाठविलेल्या पार्सलमध्ये ड्रग्ज आहे', अशी भीती दाखवायला सुरुवात केली. तसेच गोल्ड ट्रेडिंगमध्ये जादा परतव्याचे, नोकरी लावून देण्याचे, मुद्रा फायनान्सद्वारे लोन मिळून देण्याचे आमिष दाखवून ठगांनी पीडितांना वेळोवेळी विविध बँक खात्यांवर पैसे पाठविण्यास भाग पाडले. या आरोपीने फिर्यादीसह इतर आठ जणांकडून आतापर्यंत एक कोटी २८ लाख ३८ हजार ७७ रुपये उकळले आहेत. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधितांनी सायबर पोलिस ठाणे गाठत फिर्याद दाखल दिली.

