

नाशिक : खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तो खोटा असल्याचे सांगत महिला पोलिस अधिकाऱ्यांवर सोशल मीडियातून आपत्तीजनक व अश्लिल शेरेबाजी करणाऱ्या निर्भय पक्षाच्या तिघा संशयितांना सायबर पोलिसांकडून शनिवारी (दि.१९) बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. महिला पोलिस अधिकाऱ्यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून, इतर संशयितांचाही शोध सुरू आहे.
हेमंत बाळासाहेब दुसाने (४६, पीरबाबा चौक, स्टेट बँकरोड, सिडको), राजेंद्र छगन खरोटे (६१, रा, बालाजी हाईटस, पंचकृष्ण लॉन्सजवळ, कोणार्क नगर), जगदीश दिगंबर भापकर (४८, सैलानी बाबा दर्गाजवळ, वाघाडी, पंचवटी) अशी अटकेतील संशयितांची नावे असून, त्यांच्यावर आयटी ॲक्टसह इतर कलमांन्वये गुन्हा नाेंदविण्यात आला आहे. त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार, त्या मोबाईलवरील फेसबुक सर्फिंग करत असताना महाराष्ट्र निर्भय पक्षाचे संशयित जितेंद्र भावे यांनी चिथावणी देणाऱ्या पोस्ट साेशल मीडियावर शेअर केल्या. त्या पोस्टला साेशल मीडियावरील हॅण्डलर संशयित रवी शेळके, मंगेश जगताप, हेमंत दुसाने यांनी अश्लील कमेंट केली. याबाबत सातपूर पोलिस ठाण्यात संशयितांविरोधात आयटी अॅक्टसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक विश्वास पाटील तपास करत आहेत.
संशयित भावेंसह इतरांवर गेल्या १२ ते १५ दिवसांत सहापेक्षा अधिक गंभीर गुन्हे नाेंद झाले आहेत. त्यामुळे आता पाेलिस कठाेर भूमिका घेणार आहेत. दाखल गुन्हे, त्यांचे स्वरुप पाहता भावेंसह संशयितांवर तडिपारी किंवा अधिक गंभीर स्वरुपाची कारवाई हाेण्याची शक्यता आहे. त्यानुसार प्रस्ताव बनविण्याचे काम सुरु हाेणार असल्याचे पाेलिसांकडून समजते. जितेंद्र भावे यांच्यासह समर्थकांविरोधात इंदिरानगर, गंगापूर, पंचवटी, सरकारवाडा, सातपूर आणि मुंबई नाका पोलिस ठाण्यात खंडणीसह बदनामी, विनयभंग, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन असे गुन्हे नाेंद आहेत.