

नाशिक : पतीसह सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी गंगापूर, सातपूर आणि नाशिकरोड पोलिसांत विवाहिता छळाचे तीन गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
पहिल्या गुन्ह्यातील पीडितेच्या फिर्यादीनुसार पतीने क्षुल्लक कारणातून वाद घालून छळ केला. तर, 'नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी वडिलांकडून ५० लाख रुपये आणावेत', अशी मागणी केली. पीडितेचे आठ लाख रुपयांचे दागिने, हिऱ्याच्या अंगठ्या, ब्रेसलेट काढून अपहार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. गंगापूर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत. तर, सातपूर परिसरातील विवाहितेचा तिच्या सासरच्यांनी शारीरिक व मानसिक छळ करत कालांतराने तिला घरातून हाकलून दिल्याचा आरोप पीडितेने केला आहे.
२७ एप्रिल २०१८ ते १४ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत ती ठाणे जिल्ह्यातील रेतीबंदर भागातील सासरी नांदताना सासरकडील तीन पुरुष व तीन महिलांनी तिला उपाशीपोटी ठेवून पैशांची मागणी केली. यानंतर तिला हाकलून दिले. सातपूरचे हवालदार सूर्यवंशी तपास करत आहेत. तिसऱ्या घटनेत पुणे जिल्ह्यातील हवेली पोलिस स्टेशनजवळील सासरी नांदणाऱ्या पीडितेने सासरच्यांविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. त्यानुसार २४ फेब्रुवारी २०२३ ते ६ जून २०२५ या कालावधीत तिला सासारच्या तीन महिला व पुरुषांनी संगनमत करून क्रूर वागणूक दिली. स्वतःचा खर्च करण्यासह दवाखान्याचे पैसे आई-वडिलांकडून आणण्यास सांगितले. तसेच मुलगा झाल्यास तो नणंदेला द्यावा, असे म्हणून पती प्रशांत याने काहीतरी कारणातून पत्नी गर्भवती असतानाही तिच्या पोटात लाथा मारून छळ केला, असे नमूद आहे.