

नाशिक : मनमाडमधील डमरे कॉलनीत घरफोडी करीत तब्बल १,२०० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि आठ लाखांची रोकड पळविणाऱ्या टोळीला गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखा आणि मनमाड पोलिसांना यश आले आहे. तिघा सराईतांना बेड्या ठोकल्या आहेत. तसेच त्यांच्याकडून एक किलो सहा तोळे वजनाचे दागिनेही हस्तगत केल्याची माहिती पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ॲल्युमिनियमचे व्यापारी मुर्तजा अब्दुल हुसेन रस्सीवाला हे कुटुंबीयांसह बाहेरगावी गेलेले असताना, चोरट्यांनी त्यांच्या घराच्या खिडकीचे गज कापून व वाकवून घरात प्रवेश करीत, बेडरूममधील कपाटात ठेवलेले १,२०० ग्रॅम वजनाचे दागिने व आठ लाख रुपयांची रोकड चोरली होती. या प्रकरणी गेल्या बुधवारी (दि. ११) मनमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. उपविभागीय पोलिस अधिकारी बाजीराव महाजन यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी करत श्वानपथक, ठसे तज्ज्ञ, फॉरेन्सिक पथकाला घटनास्थळी पाचारण केले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र मगर, मनमाड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजय कारे यांनी आरोपींची गुन्हा करण्याची पद्धत व घटनास्थळ परिसरातील तांत्रिक बाबींचा काटेकोरपणे अभ्यास केला असता, गुन्हा हा स्थानिक रेकॉर्डवरील गुन्हेगारांनीच केला असल्याचा तर्क लावत त्यानुसार तपासाची चक्रे फिरविली. गुन्ह्याच्या समांतर तपासात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मनमाड शहर व चांदवड परिसरातून संशयित संजय किशोर गायकवाड (३५), राकेश अशोक संसारे (३०, दोघेही, रा. आनंदवाडी, सुभाषनगर, मनमाड, ता. नांदगाव), राजेश रामशंकर शर्मा ऊर्फ भैया (३०, रा. मदिना चौक, सारडा सर्कल, मारुती मंदिराच्या पाठीमागे, नाशिक) यांना ताब्यात घेतले. संशयितांकडे सखोल तपास केला असता, त्यांनी घरफोडी केल्याची कबुली दिली.
तसेच त्यांच्याकडून १ किलो ५५.८५० ग्रॅम वजनाचे सुमारे एक कोटी पाच लाख ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. संशयितांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही जप्त केली. गुन्ह्यातील अन्य मुद्देमालाबाबतही पोलिसांकडून सखोल तपास केला जात असल्याचे पोलिस अधीक्षक पाटील यांनी सांगितले.
---
तिघेही सराईत गुन्हेगार
मूळचा गोरखपूरचा (उत्तर प्रदेश) रहिवासी, संशयित राजेश शर्मा याच्यावर घरफोडी, चोरी आणि दरोड्यासह एकूण २७ गुन्हे दाखल आहेत. याचप्रमाणे त्याचा साथीदार गायकवाड याच्यावर आठ, तर संसारे याच्यावर चार गुन्हे आहेत. अलीकडेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून जामिनावर सुटलेला शर्मा मनमाडमध्ये पुन्हा गुन्हा करण्याच्या तयारीत होता, असे पोलिस तपासात उघड झाले आहे.
---
---
फोटो सीटी १ ला घरफोडी नावाने सेव्ह आहे