

नाशिक : चारचाकी वाहनाचे आरसीबुक गहाळ झाल्याबाबतचा बनावट दाखला सादर करून शासनाची फसवणूक व दिशाभूल केल्याप्रकरणी हिना दिपेश चंगराणी (रा. शुभांगी रेसिडेन्सी, महात्मानगर, सातपूर) हिच्याविरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कर्मचारी रमाकांत रामदास घरटे, (४०, रा. लक्ष्मीनारायण रेसिडेन्सी, मेरी रासबिहारी, लिंकरोड, पंचवटी) यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. २०२१ ते २०२५ या कालावधीमध्ये शासनाची दिशाभूल आणि फसवणुक केल्याचे या फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे.
२०१९ मध्ये सातपूर औद्योगिक वसाहतीतील जे. एम. इंजिनिअरींग या कंपनीत चोरी झाल्याबाबतचा गुन्हा सातपूर पोलिस ठाण्यात दाखल होता. या गुन्ह्यात छोटा हत्ती (एम. एच. १५, सी. के. ३०६२) या वाहनाचे आरसी बुक चोरी झाल्याचे नमुद केले होते. त्यानंतर हिना चंगराणीने २०२१ साली निफाड तालुक्यातील सायखेडा पोलिस ठाण्याचा आरसी बुक गहाळ झाल्याचा दाखला प्राप्त करून नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयात सादर करून वाहन विक्री व बँक ऑफ बडोदाचा बोजा कमी करण्यासाठी वापरात आणला होता. परंतु सदर बाबीची चौकशी केली असता, सायखेडा पोलिस ठाण्याच्या ‘गहाळ दाखला मुद्देमाल रजिस्टर’मध्ये या दाखल्याची नोंद नसल्याचे समोर आले होते. त्यानंतर सायखेडा पोलिस ठाण्याकडून नाशिक परिवहन प्रादेशिक कार्यालयात पत्रव्यवहार करून ही बाब कळवण्यात आली होती.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाने, कमर्चारी रमाकांत घरटे यांना प्राधिकृत अधिकारी करून पंचवटी पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविण्याचे आदेशित केले होते. त्यानुसार बनावट दाखला वापरून शासनाची फसवणूक आणि दिशाभूल केल्याप्रकरणी हिना चंगरानीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक पडोळकर, पाटील हे अधिक तपास करीत आहेत.