

नाशिक : बंदुकीच्या धाकावर व्यावसायिकाचे अपहरण करून खंडणी उकळल्या प्रकरणाचा छडा लावण्यात गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाला मोठे यश मिळाले आहे. या गुन्ह्याचे षडयंत्र संबंधित व्यावसायिकाच्या नोकरांनीच रचल्याचे तपासात उघड झाले असून, पोलिसांनी चौघा संशयितांना अटक केली आहे. तर एक संशयित सध्या फरार आहे.
निखील प्रदीप दर्यानानी (२७, रा. टाकळी रोड) यांचे ४ एप्रिल रोजी दुपारी ३.१५ वाजता अपहरण झाले होते. अपहरणकर्त्यांनी एक कोटीची खंडणी मागितली होती. त्यानंतर दर्यानानी यांनी १५ लाख रुपये दिल्यानंतर, मिळालेल्या संधीतून स्वत:ची सुटका करून घेतली होती. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपआयुक्त प्रशांत बच्छाव आणि सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट एकचे प्रभारी पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या पथकाने समांतर तपास केला.
तपासादरम्यान मोहम्मद अन्वर सय्यद (३०, रा. नानावली), सादिक लतिफ सय्यद (३९, रा. लेखानगर), अल्फरान अश्पाक शेख (२५, रा. चौक मंडई) आणि अहमद रहिम शेख (२५, रा. वडाळागाव) या चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यांचा एक साथीदार शकील पठाण सध्या फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
अल्फरान आणि अहमद यांनीच खंडणीसाठी हे षडयंत्र रचल्याचे उघड झाले असून, हे दोघेही दर्यानानी यांच्या दुकानातच काम करत होते. पोलिसांनी सादिककडून २.८८ लाखांची रोकड व मोबाइल असा ३.०८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. न्यायालयाने चारही संशयितांना १६ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
निखील हे काठेगल्ली सिग्नलजवळ आले असता, 'चर्चा करायची आहे' असे सांगून दोघे त्यांच्या कारमध्ये बसले आणि नंतर बंदुकीच्या धाकाने त्यांना घोटीच्या दिशेने नेले. निर्जनस्थळी नेत हवेत गोळीबार करीत त्यांनी निखील यांना भावाकडून पैसे मागण्यास भाग पाडले. त्यानुसार एका संशयिताने नाशिक रोड परिसरात ताब्यात घेतले. त्यानंतर अपहरणकर्ते निखील यांना पुन्हा शहरात घेऊन आले आणि अंबड येथील कार शोरूमजवळ दुसऱ्या कारमध्ये डांबण्याचा प्रयत्न केला. मात्र, निखील यांनी समयसूचकता दाखवत शिताफीने सुटका करून घेत पोलिसांकडे धाव घेतली.
मोहमंद सय्यदवर सात, तर फरार शकील पठाणवर १९ गंभीर गुन्हे दाखल असून, तो टिप्पर टोळीशी संबंधित असल्याचे पोलिसांनी सांगितले. दर्यानानी यांच्या दुकानात काम करणारे संशयित गुन्ह्यानंतरही कामावर येत होते. मात्र, पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्हीच्या आधारे केलेल्या तपासानुसार त्यांचे बिंग फुटले.
अपहरणकर्त्यांनी निखीलला त्याच्या मोबाइलवरून भावाशी संपर्क साधत, जागा व्यवहारासाठी एक कोटी रुपये मागण्यास भाग पाडले. भावाने एवढी रक्कम नसल्याचे सांगत १५ लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार एका संशयिताने नाशिक रोड येथील चित्रपटगृहाजवळ निखीलच्या भावाकडून पैसे घेतले. अपहरणकर्त्यांनी घेतलेल्या खबरदारीमुळे निखीलचे अपहरण झाल्याची पुसटशीही कल्पना त्याच्या भावाला आली नाही.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक हिरामण भोये, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सुदाम सांगळे, हवालदार महेश साळुंके, उत्तम पवार, अंमलदार आप्पा पानवळ, विलास चारोस्कर, नितीन जगताप, राहुल पालखेडे, राम बर्डे, मुक्तार शेख, किरण शिरसाठ, सुक्राम पवार, मनीषा सरोदे आदींच्या पथकाने ही कामगिरी केली. संशयितांच्या शोधासाठी पथकाने नाशिकसह छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यातही तपास केला.