

दिंडोरी (नाशिक): वरखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराअभावी अपघातग्रस्त फकिरा भिका कासे यांचा मृत्यू झाला. रविवारी (दि. १८) अपघातानंतर वेळेत उपचार आणि रुग्णवाहिका न मिळाल्याने त्यांचा जीव गेला. घटनेच्या वेळी तीनही डॉक्टर अनुपस्थित होते. यामुळे संतप्त नागरिकांनी तालुका आरोग्याधिकारी डॉ. कल्पेश चोपडे यांना घेराव घालून, अनुपस्थित डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
गेल्या ६ महिन्यांत कोणत्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णसेवा केली. किती रुग्ण तपासले, याची चौकशी करावी. तसेच तीनपैकी केवळ एकच डॉक्टर तेही एकच दिवस सेवा बजावतात. इतर दिवस नाशिकला राहतात, असा आरोप करण्यात येऊन वरिष्ठ स्तरावरून सखोल चौकशी करुन दोषी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदविण्याची मागणी शिवसेना उबाठा गटाचे दिंडोरी लोकसभा समन्वयक योगेश बर्डे, तालुकाप्रमुख पांडुरंग गणोरे, वरखेडा सोसायटीचे चेअरमन डी. एस. उफाडे, सरपंच केशव वागले, उपसरपंच राजेंद्र उफाडे, सोमनाथ वतार यांनी केली आहे.
तालुक्यातील आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला असून येथे अनुभवी तालुका आरोग्य अधिकारी यांची नेमणूक करावी, तळेगाव दिंडोरी येथे डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्ण दगावला होता. तेव्हाही गैरहजर वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही. त्यामुळेच हलगर्जीपणा कायम राहून अपघातग्रस्त दगावला, त्यामुळे यावेळी दोषींवर कारवाई झालीच पाहिजे, असा मुद्दा यावेळी मांडण्यात आला.
वरखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण तीन वैद्यकीय अधिकारी पदे मंजूर आहेत. येथे डॉ. शुभांगी हिवाळे या कार्यरत आहेत. उर्वरित दोन पदे रिक्त असले तरी कोचरगाव येथील डॉ. खोकले तसेच कोशिंबे येथील डॉ. प्रसाद साळुंखे यांची तात्पुरती नियुक्ती झालेली आहे. कागदोपत्री तीन डॉक्टर कार्यरत असताना घटनेच्या वेळी एकही उपस्थितीत नव्हता. परिणामी, जखमीला जीव गमवावा लागला. या तीनही डॉक्टरांवर गुन्हा दाखल न झाल्यास आंदोलन उभे करू.
योगेश बर्डे, समन्वयक, शिवसेना उबाठा, दिंडोरी लोकसभा, नाशिक.