

नाशिक : भूतप्रेतबाधा, करणी, भानामती, जादुटोषा, ज्योतीष सांगून अघोरी उपचाराची जाहिरात करीत एका महिलेची फसवणूक करणाऱ्या परराज्यातील भोंदूबाबाला नाशिक जिल्हा तक्रार निवारण आयोगाने दंड ठोठावला आहे.
सिडको, उंटवाडी परिसरातील एका महिलेला कौटुंबिक समस्या सोडविण्यासाठी सोशल माध्यमाद्वारे उत्तर प्रदेशातील लवकुश आश्रमाचा महाराज संतोष सिंग भदोरिया याने संपर्क केला. महिलेच्या कुटुंबातील सदस्यांना भूतबाधा झाल्याचे सांगून, एका दिवसाच्या चिकित्सेसाठी दोन लाख ५१ हजारांची मागणी केली. ही रक्कम 'आरटीजीएस'ने पाठविली गेली. त्यानंतर या भोदूबाबाने आश्रमात बसून आॅनलाइन पद्धतीने विधी केल्याचे सांगितले. मात्र, या विधीचा संबंधित महिला व तिच्या कुटुंबियांना कोणताही गुण आला नाही. त्यामुळे महिलेने भोंदूबाबाकडे पैसे परत करण्याची मागणी केली. मात्र, त्याने पैसे देण्यास साफ नकार दिला. त्यानंतर महिलेने जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात तक्रार दाखल केली. आयोगाने संबंधित प्रकरणाचा तपास करून भोंदूबाबाने दिशाभूल करणारी जाहिरात करून महिलेची फसवणूक करत अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करत सेवा देण्यात कमतरता केल्याचे स्पष्ट केले. तसेच संबंधित महिलेला दोन लाख ५१ हजार रुपये २८ फेब्रुवारी २०२३ पासून दर साल दर शेकडा १० टक्के व्याजासह अदा करण्याचे आदेश दिले आहेत. भोंदूबाबाला ५० हजारांचा दंडही ठोठावला. शारीरिक व मानसिक त्रासापोटी १५ हजार रुपये, तक्रार अर्जाच्या खर्चापोटी सात हजार रुपये देण्याचेही आदेश दिले आहेत. दरम्यान, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्यावतीने या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.
उत्तर प्रदेशातील कानपूरजवळ असलेल्या करौली या गावात या भोंदूबाबाचा आश्रम आहे. १४ एकरांत हा अनधिकृत आश्रम असून, तथाकथित तंत्रमंत्र, जादुटोणा करण्यासाठी हा बाबा कुप्रसिद्ध आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. अनेकांच्या जमिनी हडप केल्याचा त्याच्यावर अनेकदा आरोप झाला आहे. कॅन्सरसारखे असाध्य आजार तो बरा करीत असल्याचा दावा करतो. त्याच्या अनेक विवादास्पद चित्रफिती यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत.
सामान्य लोकांच्या असाह्यतेचा फायदा घेऊन अनेक भोंदूबाबा खोटे आमिष दाखवून फसवणूक करत असतात. बऱ्याचवेळी भोंदूबाबा परप्रांतीय असल्याने न्याय मिळण्याची अपेक्षा उतर नाही. मात्र, या निर्णयामुळे भोंदूबाबांवर अंकुश बसेल.
कृष्णा चांदगुडे, राज्य कार्यवाह,