

सिन्नर (नाशिक) : नवर्याने स्वत:ला पेटवून घेत पत्नी व सासूला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी (दि. 6) मध्यरात्रीच्या सुमारास सिन्नर तालुक्यातील सोनारी गावात घडली. तत्पूर्वी संशयित नवर्याने साथीदारांच्या मदतीने चाकूचा धाक दाखवून पत्नीला पळवून नेण्याचाही प्रयत्न केला होता. या प्रकरणी केदारनाथ दशरथ हांडोरे (29, रा. शिंदेवाडी, ता. सिन्नर) याच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या वर्षी स्नेहल शिंदे आणि केदार यांनी प्रेमविवाह केला होता. मात्र, त्यानंतर दोघांमध्ये वाद झाल्याने मागील काही दिवसांपासून पत्नी स्नेहल माहेरी राहत होती. याच रागातून पती केदारनाथ हा रविवारी रात्री 12 वाजता साथिदार हरीश डुंबरे, कृष्णा थोरात, गणेश थोरात, विशाल तुपसुंदर यांच्यासह स्नेहलच्या घरी पोहचला. तिथे स्नेहल आणि केदारनाथ यांच्यात वाद झाला. केदारनाथ व त्याच्या साथीदारांची स्नेहल व तिची आईशी झटापट झाली. याचवेळी केदारनाथ याने स्नेहल हिस तोंड दाबून चाकुचा धाक दाखवला. तसेच पळवून नेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर केदारनाथ याने स्वत:ला पेटवून घेत पत्नी स्नेहल व तिच्या आईला जीवे मारण्याच्या उद्देशाने मिठी मारली. यात स्नेहल 55 टक्के, सासू अनिता शिंदे 65 टक्के भाजल्या. तर पती केदारनाथ देखील 65 टक्के भाजला. सध्या स्नेहल आणि शिंदे यांच्यावर नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर केदारनाथला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता सोमवारी (दि.7) दुपारी 2 वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी स्नेहल (19, रा. शिंदेवाडी, हल्ली मु. सोनारी, ता. सिन्नर) यांच्या फिर्यादीवरून सिन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संजय वाघमारे अधिक तपास करीत आहेत.
घटनेची माहिती मिळताच मध्यरात्रीच्या सुमारास सरपंच भगवान शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तत्काळ पोलिसांना माहिती देऊन रुग्णवाहिका बोलावून भाजलेल्या मायलेकींना सिन्नर येथे उपचारांसाठी दाखल केले. डॉक्टरांनी तपासून अधिक उपचारांसाठी नाशिकला पाठवले. तथापि, सरपंच शिंदे पुन्हा गावात आले तोपर्यंत पोलिसही घटनास्थळी पाहचले होते. मात्र, केदारनाथ हा जखमी अवस्थेत घराची कडी लावून आतच बसलेला होता. जवळपास तासाभराने त्याने दरवाजा उघडल्यानंतर त्यालाही उपचारांसाठी हलविण्यात आले.
घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संपूर्ण घटनेचा तपास आणि पंचनामा केला असून केदारने कोणत्या ज्वलनशील पदार्थाने पत्नी आणि सासूला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यासाठी फॉरिन्सिक टीमला घटनास्थळी पाचारण करण्यात आले.