

दिंडोरी : किसान क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत पीककर्ज मंजूर करून घेण्यासाठी संगनमताने कट रचून बनावट कागदपत्रे सादर करत महाराष्ट्र ग्रामीण बँक, दिंडोरी शाखेला 43.50 लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या 15 संशयितांविरोधात न्यायालयाच्या आदेशानुसार दिंडोरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकारामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
सन 2014 ते 2016 या कालावधीत किसान क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत घेतलेले थकीत कर्ज वसूल करण्याच्या अनुषंगाने वरिष्ठ कार्यालयाने दिंडोरी शाखेचे व्यवस्थापक भालचंद्र देशपांडे यांच्याकडे माहिती मागितली होती. शाखेच्या कर्मचार्यांनी संबंधित कर्जदारांची फाइल उपलब्ध करून दिल्यानंतर बँकेच्या ऑडिटदरम्यान काही संशयास्पद बाबी उघडकीस आल्या.
तलाठ्यांच्या अहवालानुसार, काही कर्जदारांच्या नावावर असलेल्या जमिनींचे क्षेत्र कमी असतानाही खोट्या कागदपत्रांद्वारे कर्ज मंजूर करण्यात आले. तसेच बनावट उतारे, खोटी प्रतिज्ञापत्रे आणि डिक्लेरेशन्स सादर करून नियोजनबद्ध कट रचून बँकेची फसवणूक करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार दिंडोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी संगनमताने बँकेची फसवणूक केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलिस निरीक्षक राकेशसिंह परदेशी अधिक तपास करत आहेत.
गौतम गोपाळ बस्ते (हातनोरे), शंकर बाळकृष्ण जाधव (पालखेड बंधारा), हिराबाई बाळकृष्ण जाधव (पालखेड बंधारा), पुंडलिक भगवंत बोरस्ते (हातनोरे), संदीप रघुनाथ जाधव (दिंडोरी), प्रवीण अंबादास जमधडे (मखमलाबाद), अंबादास खंडेराव जमधडे (मखमलाबाद), आरती मोहन पेलमहाले (पाडे), पूजा नरेंद्र पेलमहाले (पाडे), प्रमिला सुभाष पेलमहाले (पाडे), सिंधुबाई महादू नाठे (पाडे), गायत्री कृष्णा पवार (जालखेड), योगेश भिका पिंगळ (अवनखेड), पोपट शिवाजी बोरस्ते (हातनोरे), युवराज भिका सहाळे (कादवा म्हाळुंगी) या 15 जणांनी प्रत्येकी 3 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. एकूण रक्कम 43.50 लाख रुपये होते. मात्र, या कर्जदारांनी कर्जाचे नूतनीकरण न करता बँकेची फसवणूक केल्याचे समोर आले.