

सिन्नर (नाशिक): नाशिक-पुणे महामार्गाने सिन्नरकडे येणाऱ्या एका कारमधून 82 हजार रुपये किमतीचा चार किलो 20 ग्रॅम गांजा पकडून पोलिसांनी कारसह दोघांना ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी (दि.16) ही कारवाई केली. प्रथमेश पोपट राऊत (25, रा. घुलेवाडी, संगमनेर) व शिवाजी गोरख सातपुते (27, रा. साईनगर, नेहरू चौक, संगमनेर) अशी दोघा संशयितांची नावे आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. नाशिक ते पुणे महामार्गावर हॉटेल न्यु वैष्णवीसमोर पथकाने सापळा रचला होता. त्याच वेळी कार (एमएच 01 एसी 5749 ) तेथे येताच पोलिसांनी कार थांबवत प्रथमेश राऊत व शिवाजी सातपुते यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 82 हजार रुपयांचा चार किलो 20 ग्रॅम वजनाचा गांजा व कार असा एकूण आठ लाख 30 हजार 400 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्याविरूध्द सिन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मालेगाव : शहरातील तीन कंदील, बुधवार वॉर्ड परिसरात काही संशयित अवैधरित्या धारदार शस्त्रे बाळगून फिरत असल्याची बातमी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली होती. त्यानुसार पथकाने आझादनगर पोलिस ठाणे हद्दीतील तीन कंदील, बुधवार वॉर्ड परिसरातून संशयित अन्सारी अबु हुझेफा रईस अहमद (23, रा. नयापुरा, गल्ली नं.9 , मालेगाव) व अन्सारी साद अंजुम (20, रा. मोती तालाब, गल्ली नं. 4 , मालेगाव) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून धारदार तलवारी जप्त करण्यात आल्या. दोघांविरुध्द आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.