

नाशिक : गुंतवणुकीचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या सायबर भामट्यांनी देशभरातील ५०० हून अधिक बँक खात्यांमधून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार केल्याचे उघड झाले आहे.
सायबर भामटे बँक खातेधारकांना कमिशनच्या आमिषाने फसवून त्यांची खाती गैरकामासाठी वापरत आहेत. सायबर पोलिसांनी अलिकडेच झालेल्या एका प्रकरणात शहरातील एका बँक खातेधारकाला अटक करून चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. भामट्यांनी संबंधित खातेधारकाला दोन दिवस हॉटेलमध्ये ठेवून त्याच्या खात्यातून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार केले होते.
शहरातील दोन नागरिकांना सायबर भामट्यांनी ८ फेब्रुवारी ते ७ मार्च दरम्यान, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीस प्रोत्साहित करीत एक कोटी २८ लाख ९० हजार रुपयांचा ऑनलाइन गंडा घातला. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात भामट्यांसह ज्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले त्यांच्याविरोधात ८ मार्चला गुन्हा नोंदवला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष ढवळे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने तपास करीत म्हसरुळ परिसरातील एका संशयितास पकडले. मंडप डेकोरेशनचे काम करणाऱ्या या संशयिताच्या बँक खात्यातून भामट्यांनी सुमारे एक कोटी रुपयांंचे व्यवहार केल्याचे आढळून आले.
सखोल तपासात भामट्यांनी त्याला पेठरोडवरील एका हॉटेलमध्ये दोन दिवस ठेवले होते. या दरम्यान, भामटेही खातेधारकासोबत राहत होते. भामट्यांनी फसवणुकीचे पैसे खात्यात येताच काही क्षणात ऑनलाइन पद्धतीने पैसे इतर शंभरहून अधिक बँक खात्यांमध्ये वर्ग केले. पोलिसांनी त्यातील बहुतांशी बँक खाती गोठवली आहेत. भामट्यांनी केलेल्या ऑनलाइन व्यवहारांचा तपास करताना पाेलिसांना वेळ लागतो व तोपर्यंत भामटे पैसे काढून किंवा ऑनलाइन खरेदी करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
म्हसरुळ येथील मंडपधारकाला भामट्याने एका कोटीच्या व्यवहारावर ६० हजार रुपयांचे कमिशन देण्याचे आमिष दाखवले. त्याने खात्याची माहिती, डेबिट कार्ड आणि सिम कार्ड दिले, ज्यामुळे फसवणुकीचे पैसे त्याच्या खात्यात जमा झाले. तेव्हा, सायबर पोलिसांनी १५ लाख रुपये गोठवल्याचे सांगत भामट्याने त्याला केवळ १५ हजार रुपये दिलेत. दरम्यान, नविन बँक खाते सुरू करण्याच्या किंवा कर्ज देण्याच्या बहाण्याने नागरिकांची कागदपत्रे घेत फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे.
फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सायबर पोलिस व बॅंक प्रशासन तपास करीत ज्या बँक खात्यांमधून पैशांचे व्यवहार झाले ती बँक खाती गोठवतात. त्यामुळे एकाच वेळी शेकडो बँक खाती गोठवले जातात. फसवणुकीच्या एका गुन्ह्यात वापरलेल्या बँक खात्यातून पंचवटीतील फुल विक्रेत्याच्या खात्यात ३० रुपयांचा अ ॉनलाइन व्यवहार झाला. त्यामुळे या विक्रेत्याचेही बँक खाते गोठवण्यात आले. मात्र, त्याचा फसवणुकीच्या गुन्ह्याशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध नसल्याचे तपासात उघड झाले. तरीदेखील त्याचे बँक खाते गोठवल्याने विक्रेत्याचे हक्काचे ४ लाख रुपयेही अडकले. त्यामुळे त्याच्यासमाेर आर्थिक अडचणी सुरू झाल्या. त्याने सायबर पोलिसांकडे आपबिती सांगत मदत मागितली.
सायबर पोलिसांच्या तपासात फसवणुकीचे पैसे जमा होताच भामटे ऑनलाइन पद्धतीने काही क्षणात पैसे एकापाठोपाठ एक अशा किमान १०० ते कमाल हजार बँक खात्यांमध्ये पैसे जमा करत असल्याचे बोलले जाते. नाशिक येथील दाखल गुन्ह्यातही पोलिसांच्या तपासात भामट्यांनी दिवसभरात ५०० बँक खात्यांचा वापर करीत तीन हजार ७०० हून अधिक व्यवहार केल्याचे उघड झाल्याचे सुत्रांनी सांगितले.