

नांदूरशिंगोटे (सिन्नर, नाशिक) : सिन्नर तालुक्यातील दोडी येथे मंगळवारी (दि.31) दुपारी 3 वाजता तिघा चोरट्यांनी घरात शिरून महिलेच्या गळ्याला चाकू लावून गळ्यातील साखळी, हातातील अंगठी हिसकावून घेत कपाटात ठेवलेले दागिने व रोकड घेऊन पोबारा केला. शेतकरी शेतातील कामात व्यस्त असताना चोरटे घरफोडी करत असून, आता थेट महिलेच्या गळ्याला चाकू लावून घरफोडीची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील फुलेनगर व नांदूरशिंगोटे येथे घरफोडी झाल्याच्या घटना ताज्या आहेत. फुलेनगर येथे घरामागील शेतात शेतकरी काम करताना चोरट्यांनी संधी साधत घरफोडी केली होती. तर नांदूरशिंगोटे येथे कुटुंबीय घराबाहेर गेलेले असल्याची संधी साधत घरात शिरून रोकड व दागिने पळवले होते. त्यानंतर आता दुसऱ्याच दिवशी चोरट्यांनी दोडी शिवारातही भरदिवसा महिलेच्या गळ्याला चाकू लावून लुटल्याची घटना घडली. शेत गट नं. 599 मध्ये राहणाऱ्या शुभांगी आव्हाड या दुपारी घरात एकट्याच असल्याचा फायदा घेत तिघांनी घरात प्रवेश केला. एकाने शुभांगी यांच्या गळ्याला चाकू लावून त्यांच्या गळ्यातील 1 तोळ्याची साखळी व 7 ग्रॅमची अंगठी बळजबरीने काढून घेतली. तर दोघांनी घरातील कपाटात ठेवलेली 11 ग्रॅमची पोत व 6 ग्रॅमचे दागिने काढून घेतले. चोरट्यांनी तीन तोळ्यांचे दागिने चोरून तेथून पोबारा केला. यानंतर शुभांगी यांनी आरडाओरड केली असता ग्रामस्थांनी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत चोरटे पसार झाले होते.
वावी पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. याप्रकरणी पोलिसांनी तीघांविरोधात गुन्हा दाखल केला.
सिन्नर : तालुक्यातील आगासखिंड शिवारात ओम साईराम हॉटेलसमोरील मोकळ्या जागेत ठेवलेले 1 लाख रुपये किमतीचे विद्युत खांब चोरट्यांनी चोरून नेले. चेतन मनोहर शेळके हे ठेकेदार असून, त्यांचे या भागात विद्युत खांब टाकण्याचे काम सुरू आहे. त्यांनी हॉटेलसमोर विद्युत खांब आणून ठेवले होते. मात्र, रात्रीतून चोरट्यांनी तेथून 1 लाख रुपयांचे लोखंडी खांब चोरून नेले. याप्रकरणी शेळके यांनी सिन्नर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.