

नाशिक : शहरातील गुन्ह्यांमध्ये रिक्षाचालकांचा सहभाग समोर आल्याने तसेच वाहतूक कोंडीस सर्वाधिक जबाबदार असणाऱ्या रिक्षाचालकांवर शहर पोलिसांनी मार्च महिन्यापासून दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार १३ मार्चपासून सुरू केलेल्या मोहिमेत शहर पोलिसांनी १० हजार १४७ रिक्षाचालकांवर कारवाई केली आहे.
गणवेश न घालणे - ६,२३३
फ्रंटसीट प्रवासी वाहतूक - २,२४४
स्क्रॅप रिक्षा चालवणे - ५१
नंबर प्लेट नसणे - २१
इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन - १,५८०
गुन्हे दाखल असलेले रिक्षाचालक - १८
शहरात रिक्षा प्रवास करणाऱ्यांकडील किंमती ऐवज चोरी जाण्यात रिक्षाचालकांचा सहभाग समोर येत आहेत. तसेच विनयभंग, मारहाण अशा गंभीर गुन्ह्यांमध्येही रिक्षाचालकांचा सहभाग उघड झाला. त्यामुळे गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी रिक्षाचालकांवर लक्ष केंद्रीत केले. तसेच शहरातील वाहतूक खोळंबण्यास बेशिस्त रिक्षाचालक जबाबदार असल्याने वाहतूक पोलिसांनी रिक्षाचालक तपासणी मोहीम राबवली. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे उपआयुक्त चंद्रकांत खांडवी यांच्या सूचनेनुसार वाहतूक शाखेने बेशिस्त रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली. त्यानुसार दीड महिन्यात पोलिसांनी सूमारे १० हजार बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई केली. यात चालकांकडे गणवेश नसल्याची बाब सर्वाधिक आढळून आली. तसेच गुन्हे दाखल असलेल्या १८ जणांनी रिक्षा चालवल्याचे उघड झाले. तर ५१ रिक्षा या मुदतबाह्य आढळून आल्या. त्यामुळे प्रवाशांचा जीवही धोक्यात आल्याने पोलिसांनी या रिक्षा जप्त केल्या आहेत.