

नाशिक : मध्य प्रदेश राज्यातून महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेला एक कोटीचा विदेशी मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सापळा रचून जप्त केला. शनिवारी (दि. ८) येवला तालुक्यातील येवला टोल प्लाझा, पिंपळगाव जलाल शिवार, कोपरगाव - येवला रोडवर वाहनतपासणीदरम्यान ही कारवाई करण्यात आली.
नाशिकमध्ये राज्य उत्पादन शुल्क पथकाची मोठी कारवाई
मध्यप्रदेशातील अवैद्य दारु नाशिकमध्ये
1 कोटी 7 लाख 72 हजारांचा मुद्देमाल जप्त
अवैध दारुचे एक हजार 141 बॉक्सेस जप्त,
राजस्थानमधील ट्रक चालक शंभुसिंह राजपुत्र अटकेत
मध्य प्रदेश राज्यामध्ये निर्मित या विदेशी मद्याचे तब्बल १,१४१ बॉक्स हे तपकिरी रंगाच्या आयशर ट्रक (एमएच २०, ईएल ६७९१) मध्ये वाहतूक केली जात होती. याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला माहिती मिळाल्यानंतर पथकाने कोपरगाव - येवला रोडवरील साई सावंत हॉटेलजवळ सापळा रचला होता. याठिकाणी पथकाकडून वाहनांची कसून तपासणी केली असताना, आयशर ट्रकमध्ये हा मद्याचा साठा आढळला. यावेळी पथकाने आयशर ट्रकसह एक मोबाइल संच जप्त केला. जप्त मालाची किंमत सुमारे एक कोटी, सात लाख, ७२ हजार ८८० रुपये इतकी आहे. यातील मद्याची किंमत एक कोटीपेक्षा अधिक असल्याची माहिती पथकाकडून देण्यात आली आहे. यावेळी पथकाने वाहनचालक शंभुसिंह भेरूसिंह राजपूत (३३, रा. बस्सी, पो. सिघावत, ता. सलंबर, जि. उदयपूर, राजस्थान) याला ताब्यात घेतले असून, इतर संशयित फरार आहेत.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त उषा वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. भरारी पथकात प्रभारी निरीक्षक किरण धिंदळे, दुय्यम निरीक्षक पी. आर. मंडलिक, डी. बी. कोळपे, सहायक दुय्यम निरीक्षक किरण गांगुर्डे, जवान सर्वश्री धनराज पवार, महेश सातपुते, युवरात रतवेकर, राहुल पवार, विलास कुवर, महिला जवान सुनीता महाजन, मुकेश निंबेकर आदींचा सहभाग होता.