

सिडको (नाशिक): सिडकोतील गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले असुन त्रिमुर्ती चौकातील उंटवाडी येथील शाळेसमोर रस्त्यावर तीन ते चार युवकांनी एका तरुणावर चोपर व कोयत्याने हल्ला करून जखमी केले. याप्रकरणी अंबड पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. प्रेमप्रकरणातून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे.
मंगळवारी (दि.8) दुपारी नागरिकांच्या देखल हल्ल्याचा हा प्रकार घडला. या हल्ल्यात युवकाच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तो जखमी झाला. दिवसाढवळ्या हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे पथकासह घटनास्थळी दाखल झाले.
जखमी युवकाने अंबड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली नाही, अखेर अंबड पोलिसांनी फिर्याद दाखल करुन घेत मारहाण करणाऱ्या जय गुरव (२०) याच्यावर कोयता बाळगल्या प्रकरणी तसेच दहशत निर्माण केल्याप्रकरणी अंबड पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.