

नाशिकरोड : रेल्वे पोलिसांनी अवघ्या दोन तासांत चोरीच्या मालासह चोरट्याचा अटक केली. ही कारवाई मध्यप्रदेशातील प्रवासी यश्वी राजेंद्र धरवा (24) यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली. हा प्रकार पंजाब मेलच्या नाशिकरोड ते चाळीसगाव प्रवासादरम्यान घडला होता.
धरवा यांच्या बॅगची चोरी झाली होती. या बॅगेत लॅपटॉप, मोबाईल, पॉवर बँक, इअरफोन, चॉकलेट, परफ्यूम आणि 720 रुपये असा एकूण एक लाख तीन हजार 720 रुपयांचा ऐवज होता. त्यांनी अंदाजे 25 ते 30 वर्षे वयाचा, निळसर टी-शर्ट आणि काळी पॅन्ट घातलेला युवक बॅग घेऊन जाताना पाहिला होता. त्यानुसार रेल्वे पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम सुरू केली. संशयित त्याच गाडीतील जनरल कोचमध्ये मिळून आला. त्याने आपले गायकवाड असे नाव सांगितले. तपासणीदरम्यान त्याच्याकडे चोरीस गेलेली बॅग आणि सर्व माल मिळून आला. फिर्यादीने व्हिडिओ कॉलवरून बॅगेची ओळख पटवली. रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे चोरीस गेलेला ऐवज सुरक्षितपणे परत मिळाला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. सहायक पोलिस निरीक्षक सचिन बनकर, पोलिस उपनिक्षक संजय केदारे, सुभाष कुलकर्णी, हवालदार उत्तम शिरसाठ, अल्का तळोले तसेच रेल्वे सुरक्षा बलातील मनिषकुमार व भूषण पाटील यांनी ही कामगिरी केली.