

नाशिक : काही दिवसांपूर्वीच वंचितमधून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या माजी नगरसेवक पवन पवार याच्यासह पाच जणांवर देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरक्षारक्षक आणि अभियंत्याला दमबाजी करीत तब्बल अडीच लाखांचा ऐवज लंपास केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
याप्रकरणी प्रताप शिवाजी चुंभळे (रा. लेखानगर, सिडको) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या बेलतगव्हाण येथील ए ब्लॉक, सर्व्हे नं. २१/२ येथील कार्यालयात २२ नोव्हेंबर रोजी रात्री सायंकाळी ७ ते रात्री ८ वाजेदरम्यान संशयित माजी नगरसेवक पवन पवार, विशाल पवार, रामेश्वर पटेल, युवराज मोरे, नाना पगारे यांच्यासह ५० ते ६० अनोळखी इसमांनी लाठ्याकाठ्या, कोयते घेवून कार्यालयात प्रवेश केला. तेथील सुरक्षारक्षकाला दमबाजी, शिविगाळ करीत, चापटीने मारहाण केली. तसेच सीसीटीव्हीची देखभाल करणाऱ्या अभियंत्यालाही दम देवून तेथून हाकलून लावले. तसेच कार्यालयाची तोडफोड केली. यावेळी कार्यालयातील टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली एक लाख ७० हजारांची रोकड, कपाटात ठेवलेले जागेच्या मिळकतीचे मुळ दस्तऐवज, ३४ हजार दोनशे रुपये किंमतीचा प्लस कंपनीचा डीव्हीआर व सहा सीसीटीव्ही कॅमेरे, १९ हजार पाचशे रुपये किंमतीची हेव्ही ड्यूटी ट्युबिलर बॅटली व शाहटेक कंपनीचा १२ व्ही युपीएस तसेच २४ हजारांचा समॅसंग कंपनीचा टीव्ही असा एकूण दोन लाख ४७ हजार सातशे रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. दरम्यान, याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात पवन पवार याच्यासह ५० ते ६० जणांच्या टोळक्याविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणूकीदरम्यान पवन पवार याला हद्दपार करण्यात आले होते. हद्दपारीचे आदेश असतानाही त्याने गोल्फ क्लब मैदान येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता.