

नाशिक : दुहेरी खुन प्रकरणातील जन्मठेपेतील आरोपीसह आणखी एका आराेपीने नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण, शिवीगाळ केली. तसेच एकाने कटरने मान कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात दोघांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सलीम उर्फ पाप्या ख्वाजा शेख व तबरेज उर्फ तब्बू दरवेश खान अशी दोघा आरोपींची नाव आहेत. त्यातील पाप्या यास शिर्डी येथील दुहेरी खुन प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पोलिस अधीक्षक जगदीश ढुमणे यांच्या फिर्यादीनुसार, दोघांनी शनिवारी (दि.९) सकाळी ९.३० वाजता नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात गोंधळ घालत सरकारी कामात अडथळा आणला. नेहमीप्रमाणे सकाळच्या सत्रात कैद्यांची अंगझडती घेत असताना सलीम शेख व तबरेज खान यांनी शासकीय कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच तबरेज याने त्याच्याकडील कटरने स्वत:च्या मानेवर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी नाशिक रोड पोलिस तपास करीत आहेत.
नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात क्षमतेपेक्षा कमी कैदी आहेत. तसेच त्यांना भेटण्यासाठी येणाऱ्यांना विशिष्ट अंतर ठेवून संवाद साधावा लागतो. अशा वेळी शिक्षा भोगणाऱ्या तबरेज खान याच्याकडे कटर आढळून आल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे. याआधीही कारागृहात कैद्यांकडे मोबाइल, इतर शस्त्र आढळून आली. तसेच एका कैद्याने किल्ली गिळल्या होत्या. त्यामुळे कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.