

नाशिक : आगामी महापालिका निवडणूक तसेच दिवाळी आणि इतर सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांची यादी अद्ययावत करण्यात आली आहे.
वारंवार गुन्हे करणारे तसेच टोळ्यांशी संबंधित असलेल्या व्यक्तींवर मोक्का, स्थानबद्धता, हद्दपारी आणि प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. यंदा मागील वर्षाच्या तुलनेत कठोर भूमिका घेण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.
आगामी गणेशोत्सव, दिवाळी आणि सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आतापासूनच आयुक्तालयाने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यादृष्टीने आवश्यक कारवाई व त्यातील बाबींची पूर्वतयारी पूर्ण झाली आहे. दोन्ही परिमंडळांसह पोलिस ठाण्यांच्या संबंधित विभागांनी सराईतांची यादी अद्ययावत केली आहे. या यादीनुसार पुढील काही दिवसांत कारवाई आरंभली जाणार आहे. यापूर्वी शरीर व मालाविरुद्धचे गुन्हे असणाऱ्यांसह विविध गंभीर गुन्ह्यांत सहभागी हिस्ट्रीशिटरची यादी तयार झाली आहे. शहरातील टाॅप टेन सराईत व गुन्हेगार वेगळे केले जाणार आहेत. पोलिस ठाणेनिहाय 'टाॅप टेन' संशयितांवर अधिक तीव्र व कठोर स्वरूपाची कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, यंदा कारवाईचा आलेख मागील वर्षीच्या तुलनेने अधिक वाढविला जाणार असल्याचे समजते.
यापूर्वी पोलिसांनी राजकीय नेत्यांसह त्यांची मुले व इतरांवर मोक्का, हद्दपारी व इतर गुन्हे नोंदविले होते. मात्र, कालांतराने अचानक हे गुन्हे खिळखिळे झाले, एव्हाना रद्दही झालेत. त्यातून अनेकांना दिलासा मिळून ते भाजपवासी होण्यात यशस्वी झाले आहेत. त्यानुसार यापुढे राजकीय नेते, पक्ष पदाधिकारी, नेत्याच्या व लोकप्रतिनिधीच्या मर्जीत राहून गुन्हे करणाऱ्यांना हेरले जाणार का? त्यातील अनेकांचा 'टाॅप टेन' यादीत समावेश असून, त्यांच्यावर कारवाई होणार की फार्सच राहणार हे लवकरच समोर येणार