

नांदगाव (नाशिक) : येथील पोलिसांनी केलेल्या कारवाईत १६ लाख ३९ हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला असून, या प्रकरणी दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करून अटकेची प्रक्रिया सुरू केली आहे.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पिकअप (एमएच 19, बीएम 023) ही गाडी बेळगाव येथून नांदगावकडे येत असून, त्यातून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनुसार पोलिसांनी पिकअप थांबवून तपासणी केली असता, त्यामध्ये १६.३९ लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला. या प्रकरणी नीलेश दिलीपचंद बोथरा आणि महेश रमेश आहेर (दोघे रा. विंचूर, ता. निफाड, जि. नाशिक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यशस्वी कारवाईसाठी पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने विशेष मेहनत घेतली.