

नाशिक : शहरातून दुचाकी चोरीचे सत्र थांबता थांबत नसल्याचे दिसून येत आहे. दररोज शहरातून दुचाकी चोरीला जात असून, चोरट्यांनी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. शहरातून चोरट्यांनी पुन्हा एकदा पाच दुचाकी चोरून नेल्या आहेत.
पंचवटी परिसरातून तीन दुचाकी चाेरी झाल्याबाबत गुन्हे नाेंद झाले आहेत. विशाल नारायण निकम (रा. कामटवाडा शिवार) यांची ८० हजारांची दुचाकी गुरुवारी (दि.८) दुपारी साडेतीन ते चार या दरम्यान गोदाघाटावरील यशवंत महाराज पटांगण येथे पार्क असता चोरट्याने चोरून नेली. तर, अशोक प्रतापराव देवकर (रा. इंद्रकुंड) यांची ३० हजारांची मोपेड गुरुवारी (दि. ८) रात्री आठच्या सुमारास गोदाघाटावरील म्हसोबा पटांगणावर पार्क असताना चोरट्याने चोरून नेली. तसेच निंबा देविदास शेवाळे (रा. गोपाळनगर, अमृतधाम) यांची ३० हजारांची दुचाकी १ मे राेजी अमृतधाम चौफुली येथे पार्क असता रात्री पावणे बाराच्या सुमारास चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हे दाखल झाले आहेत. तर मुर्तूजा शमशोद्दीन कादरी (रा. खोडेनगर) यांची ५ हजारांची मोपेड २६ ते २८ एप्रिल या दरम्यान राहत्या अपार्टमेंटच्या पार्किंगमधून चोरुन नेण्यात आली. मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल आहे. तर, सीमा अजयकुमार वाघ (रा. सिरीन मेडोज्, गंगापूर रोड) यांची १५ हजारांची मोपेड गंगापूर रोडवरील सोमेश्वर मंदिराच्या पार्किंगमध्ये पार्क असता ३ तारखेला दुपारी बारा ते एक या दरम्यान चोरट्याने चोरून नेली. गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल आहे.