

नाशिक : प्रेमसंबंधातून एकाने नात्यातीलच तरुणीवर धारदार शस्त्राने वार करून प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी (दि.१०) सकाळी गोल्फ क्लब मैदानाजवळ घडली. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर संशयित हल्लेखोरास नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
मुंबईनाका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास एक तरुणी तिच्या मित्रासह उभी होती. त्यावेळी संशयित केदार गणेश जंगम (रा. कालिकानगर, दिंडोरी रोड) हा तेथे आला. त्यांच्यात चर्चा सुरू असताना वाद झाल्याने संशयित केदार याने त्याच्याकडील धारदार शस्त्राने १९ वर्षीय तरुणीवर वार केला. त्यात तरुणी गंभीर जखमी झाली. घटनेनंतर आरडाओरड झाल्याने परिसरातील नागरिकांनी संशयित केदार यास पकडले. घटनेची माहिती मिळताच मुंबईनाका पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष नरुटे हे पथकासह घटनास्थळी गेले. त्यांनी संशयिताचा ताबा घेतला. जखमी तरुणीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात संशयित केदार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी तरुणी व संशयित हल्लेखोर केदार यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. दरम्यान, तरुणीचे दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय केदार यास आल्याने त्यांच्यात वाद झाला. या वादातून केदारने तरुणीवर हल्ला केल्याचे समजते. पोलिसांनी केदारला ताब्यात घेत चौकशी सुरू केली असून, हल्ल्याचे मूळ कारण पोलिस शोधत आहेत.