

नाशिक : गंगापूर पोलिसांनी सापळा रचून थरारक पाठलाग करून तीन सराईत गुन्हेगारांना पकडले आहे. या संशयितांविरोधात २१ गुन्ह्यांची नोंद आहे. शनिवारी (दि. ३) महिरावणी गावाजवळ पोलिसांनी ही धडक कारवाई केली. राहुल दिलीप जाधव (२५), अरबाज मोहमंद शेख (२४) व राहिल नुरुद्दीन सय्यद (२४, तिघे रा. शिवाजीनगर, सातपूर) अशी या संशयितांची नावे आहेत.
गंगापूर पोलिस ठाण्याचे अंमलदार सुजित जाधव यांना, एमपीडीए कारवाई केल्यानंतर फरार असलेला संशयित राहुल जाधव इतर दोन गुन्हेगारांसह शिवाजीनगर परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गंगापूरचे प्रभारी पोलिस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक निखिल पवार, उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, हवालदार गिरीश महाले, जाधव, गोरख साळुंके आणि सोनू खाडे यांच्या पथकाने शिवाजीनगर परिसरात सापळा रचला. पण पोलिसांची भणक लागल्यामुळे राहुलसह इतर दोघे दुचाकीवरून सातपूरच्या दिशेने पळून गेले. पथकाने त्यांचा पाठलाग करत महिरावणी गावाजवळ त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, संशयितांनी दुचाकी सोडून पळ काढला. पोलिसांनी तिघांचा पाठलाग करत त्यांना पकडले. तिघांविरोधात गंभीर गुन्हे दाखल आहेत, त्याबाबत पोलिस तपास करत आहेत.
संशयित राहुल जाधव याच्याविरोधात खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, जाळपोळ, खंडणी, शस्त्र बाळगणे असे आठ गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर हद्दपारीची कारवाई केली असून, स्थानबद्ध करण्यात आले. मात्र तो फरार होता. तर अरबाज शेख याच्याविरोधातही सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. राहिल सय्यद याच्याविरोधात दंगा करणे, शस्त्र बाळगणे, धमकावणे, मारहाण असे सात गुन्हे दाखल आहेत.